राजुरा शिवाजीनगरमध्ये वृक्षतोड प्रकरण; ओपन स्पेस मालकीबाबत नगर परिषदेला निवेदन
राजुरा : राजुरा शहरातील शिवाजीनगर कर्नल चौक परिसरात झालेल्या वृक्षतोडीच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करत नागरिकांनी नगर परिषद राजुरा मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शिवाजीनगर कर्नल चौक परिसरात केंद्र व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची गृहनिर्माण संस्था असलेली कॉलनी आहे. या कॉलनीतील ओपन स्पेसवर गेल्या सुमारे २५ वर्षांपासून वड, पिंपळ, औदुंबर यांसारखी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची झाडे आहेत. तसेच परिसरात गणेश, दत्त व हनुमान मंदिर असून स्थानिक नागरिक नियमित पूजा-अर्चा करतात.मात्र दोन दिवसांपूर्वी स्थानिक समितीकडून औदुंबर व इतर काही झाडांची तोड करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हिंदू धर्मात औदुंबर वृक्षाला विशेष धार्मिक महत्त्व असून त्यात दत्तदेवाचा वास मानला जातो. त्यामुळे अशा वृक्षतोडीमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
नागरिकांनी स्थानिक समितीकडे विचारणा केली असता ओपन स्पेससह इतर जागेची मालकी समितीकडे असल्याचा दावा करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या जागेची मालकी नगर परिषद प्रशासनाकडे आहे की स्थानिक समितीकडे, याचा लेखी खुलासा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच २५ वर्षांपूर्वीपासून रस्ते, नाले, वीज, पाणीपुरवठा आणि ओपन स्पेसची देखभाल नगर परिषद प्रशासनाकडून केली जात असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे. यासोबतच ओपन स्पेस परिसरात संरक्षक भिंत व खेळण्याचे साहित्यही लावण्यात आले आहे.
दरम्यान, झाडे तोडण्यासाठी नगर परिषदेकडून परवानगी घेण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. परवानगी न घेता वृक्षतोड करण्यात आली असल्यास संबंधितांवर पोलीस कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय पुढील काळात इतर झाडांची तोड झाल्यास त्याची जबाबदारी नगर प्रशासनाची राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.








