Sanjay Gandhi Yojana Update : नागभीड तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना; UDID प्रमाणपत्र 20 मार्चपर्यंत जमा करण्याचे आवाहन
नागभीड : नागभीड तालुक्यातील संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रशासनाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा मिळणारे ₹2500 अनुदान सुरळीत सुरू राहण्यासाठी UDID प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांगाचे UDID (Unique Disability ID) प्रमाणपत्र तात्काळ संबंधित तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालय नागभीड येथे 20 मार्च 2026 पर्यंत जमा करावे.
तसेच लाभार्थ्यांनी आपले UDID प्रमाणपत्र आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक करून घ्यावे. यासाठी जवळच्या महा ई-सेवा केंद्रात जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यास दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा ₹2500 अनुदान सुरळीत मिळत राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही सूचना अप्पर तहसीलदार शेखर पुनसे (तळोधी बाळापूर) तसेच तहसीलदार उमेश कावळे (नागभीड) यांनी जारी केली आहे.
दरम्यान, संबंधित लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती नागभीड, नगर परिषद नागभीड, नगर पंचायत नागभीड तसेच सर्व ग्रामपंचायत कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
