Ballarpur Water Supply Issue: बल्लारपूरमध्ये दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन
बल्लारपूर : बल्लारपूर शहरात होत असलेल्या दुर्गंधीयुक्त व दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदन दिले आहे.
11 मार्च 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन उपविभागीय अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात बल्लारपूर शहरातील पाणीपुरवठ्यात दुर्गंध येत असून पाणी गढूळ असल्याची गंभीर समस्या मांडण्यात आली.
निवेदनाद्वारे प्रशासनाला आठवड्याभरात शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. सध्या नागरिकांना दूषित पाणी मिळत असल्याने आरोग्याचा मोठा धोका निर्माण झाल्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, आठवड्याभरात हा प्रश्न मार्गी न लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. आंदोलनादरम्यान कोणतीही हानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची राहील, असे जिल्हाध्यक्ष प्रशांत झांमरे यांनी स्पष्ट केले.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष प्रशांत झांमरे, ओम रायपुरे, सुरज चौबे, सविता नाईक, शुभांगी मजगवळी, गायत्री चव्हाण, शिल्पा चव्हाण, कल्पना खंडागळे, मोनिका तामगाडगे, मनीषा वाडके, शितल नाईक, कविता शंभरकर, अनिता चीकाटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
