Top News

नागभीड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त Women Protection Act 2013 वर One Day Workshop आयोजित

नागभीड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त  Women Protection Act 2013 वर One Day Workshop आयोजित 




 नागभीड : नागभीड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त “अधिनियम २०१३ च्या अंमलबजावणी अंतर्गत महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षिका एम. एस. केळकर यांची उपस्थिती होती, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विकास मोहतुरे सहभागी झाले. तसेच अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाचे समन्वयक डॉ. आर. जे. रुडे यांची विशेष उपस्थिती लाभली.

उद्घाटनप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांनी “सशक्त महिला, सक्षम समाज” हे ब्रीद लक्षात ठेवून महिलांना सन्मान, समानता आणि संधी देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. शिक्षण, राजकारण, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रांत महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उल्लेखनीय यश मिळवले असून त्यांच्या योगदानाचा गौरव करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

एम. एस. केळकर यांनी यशदा तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे महिलांशी संबंधित समुपदेशनाचा दीर्घ अनुभव असल्याचे सांगितले. तरुण वयातील विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्घाटनानंतर महिला प्राध्यापक व विद्यार्थिनींसाठी विशेष समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात केळकर यांनी विविध समुपदेशन पद्धतींचा अवलंब करत विद्यार्थिनींसोबत संवाद साधला व त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. जे. रुडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वनिता शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रणाली भैसारे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post