The pride of Ballarpur : काशीनाथ सिंह यांना हैदराबाद येथे मानद डॉक्टरेट पुरस्कार
बल्लारपूर : बल्लारपूर शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी घटना नुकतीच घडली आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे भाजपाचे माजी शहराध्यक्ष तसेच बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील चंद्रपूर बांधकाम कामगार स्थानिक सनियंत्रण समितीचे सहअध्यक्ष काशीनाथ सिंह यांना हैदराबाद येथील प्रतिष्ठित एशिया वैदिक इंटरनॅशनल कल्चर अँड रिसर्च स्पोर्टी अकादमी तर्फे मानद डॉक्टरेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार त्यांना समाजसेवा, जनकल्याण आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये दिलेल्या सक्रिय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. हैदराबाद येथील सिटी कल्चर सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित हजारो लोकांनी टाळ्यांच्या गजरात काशीनाथ सिंह यांचे अभिनंदन करत त्यांचा गौरव केला.
समारंभाचा संपूर्ण वातावरण उत्साह आणि अभिमानाने भरून गेले होते. उपस्थित मान्यवरांनी काशीनाथ सिंह यांच्या सामाजिक कार्यांचे कौतुक करत त्यांना समाजासाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. अनेक वर्षांपासून बल्लारपूर परिसरात ते सामाजिक, धार्मिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत.
गरजू आणि गरीबांना मदत करणे, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने काम करणे यामुळे समाजात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत संस्थेने त्यांना ही प्रतिष्ठित मानद उपाधी प्रदान केली.
मानद डॉक्टरेट पुरस्कार स्वीकारल्यानंतर काशीनाथ सिंह यांनी संस्थेचे आभार मानत सांगितले की, हा सन्मान केवळ त्यांचा नसून बल्लारपूर शहरातील सर्व नागरिकांचा आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा आहे. भविष्यातही समाजहितासाठी अधिक समर्पणाने कार्य करत राहण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या सन्मानानंतर बल्लारपूर शहरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून काशीनाथ सिंह यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या पुरस्कार सोहळ्यासाठी हैदराबाद येथे काशीनाथ सिंह यांच्यासोबत महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा बल्लारपूरचे अध्यक्ष रमेश निषाद, फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपच्या संचालिका सरिता मालू, कु. काजल काशीनाथ सिंह, श्रीकांत कासरलावार, अंकित बर्णवाल, संजय घुगलोत आदी उपस्थित होते.
काशीनाथ सिंह यांनी या सन्मानासाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे तसेच कार्यक्रमाचे आयोजक डॉ. रमेश आकुला यांचे विशेष आभार मानले.
