महिलांची सुरक्षितता – एक सामाजिक जबाबदारी
८ मार्च ला जागतिक महिला दिन साजरा केला जातो.महिला शक्तीचा सन्मान करणे त्यांच्या कर्तुत्वाला चालना देणे, अशा प्रकारच्या सकारात्मक बाबींना उजाळा देण्यासाठी या निमित्याने जगात सर्वत्र विविध उपक्रम राबवले जातात. मात्र त्यांच्या सुरक्षेचे काय? यावर विचारमंथन होणे सुद्धा गरजेचे आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रियांना पूजनीय स्थान आहे. "नारी तू नारायणी" यावर विश्वास असणारी आपली संस्कृती आहे.
आजच्या आधुनिक युगात स्त्रिया शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण, उद्योग अशा अनेक क्षेत्रांत सर्वोच्च पदापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत. त्या कुटूंबा सोबतच समाज आणि देशाच्या विकासातही महत्त्वाचे योगदान देत आहेत. तरीसुद्धा स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही गंभीर आहे. म्हणूनच स्त्रीची सुरक्षितता ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे.
स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी अशा अनेक नात्यांमधून ती समाज घडवण्याचे कार्य करते. जर स्त्री सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण असेल, तर कुटुंब आणि समाज दोन्ही सुरक्षित राहतात. पण आज अनेक ठिकाणी छेडछाड, अत्याचार, घरगुती हिंसा यांसारख्या घटना घडताना दिसतात. अशा घटनांमुळे स्त्रियांच्या मनात भीती निर्माण होते आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येतात.
स्त्री सुरक्षिततेसाठी सरकारने अनेक कायदे आणि योजना तयार केल्या आहेत. परंतु केवळ कायदे करून हा प्रश्न सुटणार नाही.स्त्रियांच्या सुरक्षेसाठी सरकार, समाज आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधून एक सर्वसमावेशक धोरण तयार करणे आवश्यक आहे.स्रियांवरील गुन्ह्यासाठी कठोर कायदे आणि दंडात्मक तरतुदी करणे आवश्यक आहे.
सध्याच्या परिस्थितीत मुलींच्या सुरक्षेचा विषय हा आपल्या देशात खूप महत्त्वाचा आहे.मुलींवर होणारे लैंगिक अत्याचारामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे?
समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्त्रियांचा आदर करणे आणि त्यांच्याशी सन्मानाने वागणे आवश्यक आहे. मुलांना लहानपणापासूनच स्त्रियांचा सन्मान, समानता आणि संवेदनशीलता यांचे शिक्षण दिले पाहिजे.
स्त्रियांनीही शिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनणे गरजेचे आहे. आत्मरक्षणाचे प्रशिक्षण, जागरूकता आणि आत्मविश्वास यामुळे त्या स्वतःचे रक्षण करू शकतात. समाजातील सर्वांनी एकत्र येऊन स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले तरच सुरक्षित आणि प्रगत समाज निर्माण होऊ शकतो.
म्हणूनच असे म्हणता येईल की स्त्रीची सुरक्षितता ही केवळ स्त्रियांची नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. स्त्रियांचा सन्मान आणि सुरक्षा सुनिश्चित केली तरच देशाचा खरा विकास शक्य होईल.
वृंदा पगडपल्लीवार,नागभीड
9518534204
