Top News

Ballarpur Illegal Pistol Seized : अवैध पिस्टलसह तरुण ताब्यात; ७.६५ मिमी देशी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त

Ballarpur Illegal Pistol Seized : अवैध पिस्टलसह तरुण ताब्यात; ७.६५ मिमी देशी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त





बल्लारपूर : शहरातील भगतसिंग वार्ड परिसरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून फिरणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध बल्लारपूर पोलिसांनी कारवाई करत देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी फरार झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास बल्लारपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की कार्तीक उर्फ यश राकेश निषाद (वय १९) व मोनु मंजा निषाद हे दोघे भगतसिंग वार्ड परिसरात अवैधरित्या अग्निशस्त्र जवळ बाळगून फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भगतसिंग चौक परिसरात छापा टाकला.

छाप्यादरम्यान संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोन युवकांना पाहताच त्यापैकी एकाने पळ काढला, तर दुसऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या युवकाने आपले नाव कार्तीक उर्फ यश राकेश निषाद असे सांगितले असून त्याच्यासोबत असलेला मोनु मंजा निषाद हा पोलिसांना पाहताच फरार झाला.

दरम्यान, फरार आरोपी मोनु निषाद याच्या काकूच्या घरी पोलिसांनी शोध घेतला. घराची झडती घेतली असता छताच्या वासावर पिवळ्या कापडात गुंडाळून ठेवलेली देशी बनावटीची ७.६५ मिमी बोरची पिस्टल व तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून त्याची एकूण किंमत सुमारे २३ हजार रुपये असल्याची माहिती देण्यात आली.

या प्रकरणी कार्तीक उर्फ यश राकेश निषाद व मोनु मंजा निषाद (दोन्ही रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर) यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये कलम ३, २५ तसेच कलम ३(५) अन्वये बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, पोहवा संतोष पंडीत, संतोष दंडेवार, सत्यवान कोटनाके, प्रविण निकोडे, मोहनलाल निषाद, पंकज शिंदे, नापोअं सचिन अल्लेवार, पोअं खंडेराव माने, लखन चव्हाण, मिलिंद आत्राम, गुरू शिंदे, वैभव गाडगे व मपोअं रुपाली माथनकर यांनी केली.

Previous Post Next Post