Top News

समृद्ध पंचायत राज अभियानासाठी अभिनेता भारत गणेशपुरे १० मार्चला चंद्रपूर दौऱ्यावर, ग्रामस्थांशी संवाद

 समृद्ध पंचायत राज अभियानासाठी अभिनेता भारत गणेशपुरे १० मार्चला चंद्रपूर दौऱ्यावर, ग्रामस्थांशी संवाद





चंद्रपूर :  राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26” च्या प्रचार-प्रसारासाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भारत गणेशपुरे हे १० मार्च २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या भेटीमुळे ग्रामीण भागात अभियानाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे.

या दौऱ्यात भारत गणेशपुरे ग्रामपंचायत सागरा (पंचायत समिती भद्रावती), ग्रामपंचायत नांदगाव पोडे (पंचायत समिती बल्लारपूर) आणि ग्रामपंचायत जिबगाव (पंचायत समिती सावली) येथे भेट देणार आहेत. या ठिकाणी ते ग्रामस्थांशी थेट संवाद साधून पंचायत राज व्यवस्थेचे महत्त्व तसेच ग्रामीण विकासासाठी लोकसहभागाचे महत्त्व आपल्या खास शैलीतून मांडणार आहेत.

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत ग्रामीण नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका व सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सक्रीय सहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षमतेत वाढ करून शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर ५ कोटी रुपयांपर्यंतचे पारितोषिक मिळण्याची संधी आहे. सुशासन, जलसमृद्धता, स्वच्छता, डिजिटल शिक्षण आदी सात प्रमुख निकषांवर गावांच्या प्रगतीचे मूल्यांकन केले जाणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती या अभियानात सहभागी झाल्या आहेत. ग्रामस्थांनी लोकसहभाग आणि श्रमदानातून ग्रामविकासाची लोकचळवळ उभी करावी तसेच मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

Previous Post Next Post