विशेष लेख
अयोग्य प्रथा: बालविवाहाची कडू वास्तवता : स्वाती प्रल्हाद आहेर
आजच्या प्रगत युगातही आपल्या समाजात काही कालबाह्य आणि अयोग्य प्रथा अजूनही घट्ट रुजलेल्या दिसतात. विशेषतः ग्रामीण भागात आणि कमी शिक्षण असलेल्या समाजात या प्रथा “परंपरा” म्हणून पाळल्या जातात. अशाच प्रथांपैकी एक अत्यंत घातक आणि अमानवी प्रथा म्हणजे — बालविवाह.
कमी वयात मुलींचे लग्न लावून देणे ही केवळ चुकीचीच नव्हे, तर त्यांच्या भविष्यावर अन्याय करणारी प्रथा आहे. अशिक्षितपणा, जुन्या विचारसरणीचा प्रभाव आणि स्त्री शिक्षणाबाबतची उदासीनता यामुळे अनेक मुलींचे आयुष्य अंधारात ढकलले जाते. दुर्दैवाने, हे वास्तव मी स्वतः अनुभवले आहे.
माझ्या मामाचे गाव जळगाव जिल्ह्यातील वेल्हाणे हे एक छोटेसे खेडेगाव आहे. शाळेच्या सुट्टीत तिथे जाणे मला खूप आवडायचे. तिथले निसर्गसौंदर्य, साधेपणा आणि लोकांची गोड भाषा मनाला भुरळ घालणारी आहे. गावात मूलभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे जीवनशैली समाधानकारक वाटते.
परंतु, त्या गावातील मुलींबाबतचा दृष्टिकोन मात्र अत्यंत संकुचित आहे. विशेषतः त्यांच्या शिक्षणाबाबतचे विचार खूपच मागासलेले आहेत. काही अपवाद वगळता, बहुतेक लोक मुलींच्या प्रगतीपेक्षा जुन्या परंपरांना जास्त महत्त्व देतात.
“पोरींना जास्त शिकवून काय करायचं? शेवटी चुलीपाशीच जायचं ना!”
अशा प्रकारचे विचार आजही ऐकायला मिळतात.
या चुकीच्या आणि अंधश्रद्धाळू समजुतींमुळे अनेक मुलींचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त होते. पंधरा-सोळा वर्षांच्या कोवळ्या वयात त्यांच्या हातात संसाराची जबाबदारी दिली जाते आणि त्यांना सांगितले जाते — “नवऱ्याच्या शब्दाला कधीही विरोध करू नकोस.”
परंतु, कोणीही हा विचार करत नाही की त्या मुलीची स्वतःची स्वप्ने काय आहेत? तिला शिक्षण घ्यायचे आहे का? तिच्यात कोणते कौशल्य दडलेले आहे? तिच्या भावना, आकांक्षा आणि व्यक्तिमत्त्वाचा विचारच केला जात नाही. केवळ वयात आल्यावर ती लग्नासाठी तयार झाली, असा चुकीचा समज करून तिच्या आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.
ही परिस्थिती अत्यंत वेदनादायक आहे. बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि मानसिक विकासावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रथांविरुद्ध समाजात जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.
आज गरज आहे ती विचारसरणी बदलण्याची. मुलींना शिक्षण, स्वप्ने आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी देण्याची. कारण प्रत्येक मुलगी ही केवळ कोणाची मुलगी किंवा पत्नी नसून, ती स्वतःच्या आयुष्याची स्वतंत्र ओळख निर्माण करू शकते.
स्वाती प्रल्हाद आहेर
वाकी बुद्रुक. ता:-चांदवड.जि:-नाशिक
मोबाईल नंबर: 7249464824
