Top News

सरस्वती ज्ञान मंदिरच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्नेहसंमेलनात संस्कार, शिक्षण व कलेचा सुंदर संगम

 सरस्वती ज्ञान मंदिरच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्नेहसंमेलनात संस्कार, शिक्षण व कलेचा सुंदर संगम



नागभीड : शिक्षणासोबत संस्कारांची शिदोरी देणाऱ्या सरस्वती ज्ञान मंदिर शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दोन दिवसीय स्नेहसंमेलनाचा शुभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व भावस्पर्शी वातावरणात झाला. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत सरकार नोटरी ॲड. रविंद्र चौधरी होते. प्रमुख उपस्थितीत संस्था सचिव रमेश कावळे, शाळेचे मुख्याध्यापक गोकुल पानसे, पालक प्रतिनिधी मीनाक्षी खोब्रागडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख किरण वाडीकर तसेच ज्येष्ठ शिक्षिका आशा राजूरकर यांचा समावेश होता.


कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानाची अधिष्ठात्री माता सरस्वती, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. दीपज्योतीच्या प्रकाशात स्नेहसंमेलनाचा शुभारंभ होताच इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.

प्रास्ताविकात सांस्कृतिक विभाग प्रमुख किरण वाडीकर यांनी शाळेच्या वाटचालीचा मागोवा घेत विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा स्नेहसंमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व संस्कारक्षम उपक्रमांची माहिती देत रौप्य महोत्सवी वर्ष हे जबाबदारीची जाणीव करून देणारे पर्व असल्याचे त्यांनी नमूद केले.


अध्यक्षीय भाषणात ॲड. रविंद्र चौधरी यांनी स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सादर करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले. जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर यश साध्य करता येते, असे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.

उद्घाटनप्रसंगी संस्थाध्यक्ष संजय गजपुरे यांनी शाळेच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. गोरगरीब, शेतकरी, मजूर व कष्टकरी कुटुंबातील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने शाळेची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात शाळेतील सर्व वर्ग डिजिटल पद्धतीने सुसज्ज करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. शिक्षणासोबत शिस्त व संस्कार महत्त्वाचे असून पालकांनीही आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमाची सुरुवात आशा राजूरकर यांनी सादर केलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या ओवीने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, पर्यावरण, शिक्षण, विविधतेत एकता आणि प्रादेशिक संस्कृतीवर आधारित नृत्य, गायन, पथनाट्य, नाटक व पाळणा यांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग भानारकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक गोकुल पानसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आशिष गोंडाणे, सतीश जिवतोडे तसेच पूजा वीर, मेघा राऊत, नेहा कावडकर आणि शीतल टिपले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post Next Post