चिमूरमध्ये युवकाची हत्या; दारूच्या वादातून मित्रांनीच घात केला
चिमूर : शहरातील नेताजी वार्डमधील मिसाळ ले-आऊट परिसरात, हनुमान मंदिराजवळ व नेहरू विद्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत ४ जानेवारी रोजी पहाटे साडेसातच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. आकाश प्रभाकर उताणे (वय ३१, रा. ठक्कर वार्ड, तनिस कॉलनी) असे मृत युवकाचे नाव आहे. मृतकाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर चिमूर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत खुनाचा छडा लावत तिघा संशयितांना ताब्यात घेतले.
मृतकाच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा ३ जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. दुपारी त्याने नेताजी वार्डमधील मिसाळ ले-आऊट येथे राहणाऱ्या आपल्या मोठ्या मावशीकडे जेवण केले. रात्री तो घरी न परतल्याने मावशीकडेच थांबला असावा, असा अंदाज कुटुंबीयांनी बांधला होता. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी नेताजी वार्डातील एका नागरिकाला नेहरू विद्यालयाच्या मागील बाजूस रक्ताने माखलेला युवक बेशुद्धावस्थेत पडलेला दिसून आला.
ही बाब परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. माहिती मिळताच मृतकाची आई घटनास्थळी पोहोचली असता, तिचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला दिसून आला. त्याच्या चेहरा, तोंड व कानातून रक्तस्राव होत असल्याचे तसेच बाजूलाच रक्ताचे डाग असलेला दगड पडलेला आढळून आल्याने हत्या झाल्याचा संशय बळावला. यानंतर चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान दारूच्या नशेत झालेल्या शिवीगाळीतून वाद वाढून झटापट झाली आणि रागाच्या भरात दगडाने वार करून आकाश उताणे याचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
या प्रकरणात सुजल विलास सोनवाने (वय २०), छगन मोहन दिगोरे (वय २७) आणि अनिकेत शेषराव साखरकर (वय २०), सर्व रा. नेताजी वार्ड, चिमूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
