विशेष लेख : नाती जपा, वेळ परत येत नाही - स्वाती प्रल्हाद आहेर.
वेळ शिल्लक असताना आपली जवळची नाती आणि माणसं जपणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आयुष्यात गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीबद्दल गैरसमज निर्माण करून घेतो आणि त्यातून नात्यांमध्ये दरी निर्माण होते. वाद-विवाद आणि अहंकारामुळे संवाद थांबतो, आणि आपण नकळत आपल्या माणसांपासून दूर जातो.
परंतु, जेव्हा एखादी व्यक्ती खरोखरच आपल्यापासून दूर जाते किंवा आयुष्यातून निघून जाते, तेव्हा तिची उणीव प्रत्येक क्षणी जाणवते आणि मनात खोलवर पश्चात्ताप राहतो. ही जाणीव प्रत्येकाच्या आयुष्यात घडतेच असं नाही, पण ज्यांना ती अनुभवातून मिळते, त्यांना नात्यांचं खरं महत्त्व कळतं.
हे फक्त नात्यांपुरतं मर्यादित नाही. अनेकदा आपण आयुष्यात येणाऱ्या महत्त्वाच्या संधीदेखील गमावतो—त्या आयुष्य घडविण्याच्या असोत किंवा स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याच्या. पूर्वी प्रत्येक नात्याला, विश्वासाला आणि माणुसकीला मोठी किंमत होती. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात या मूल्यांचं अस्तित्व कमी होताना दिसतं.
आपल्या आयुष्यातील रिक्त जागा भरणारी माणसं जेव्हा संवादातून किंवा सहवासातून दूर जातात, तेव्हा जीवनात एक पोकळी निर्माण होते. काही गोष्टी जवळ असताना त्यांची किंमत कळत नाही; पण त्या दूर गेल्यावर त्याच गोष्टींचं महत्त्व प्रकर्षाने जाणवतं. आठवणीच मग त्या नात्यांचं महत्त्व पटवून देतात.
आजच्या काळात सर्वत्र स्पर्धा परीक्षांचं वातावरण आहे. प्रत्येकजण प्रगतीसाठी झटत आहे, जे निश्चितच सकारात्मक आहे. मात्र या धावपळीत अनेक जण केवळ अभ्यास, प्रश्नसोडवणूक आणि यश यावरच लक्ष केंद्रित करताना दिसतात. जीवनातील मूल्ये, माणुसकी, संस्कृती आणि मान-सन्मान याकडे दुर्लक्ष होत आहे.
शिक्षणासोबतच ही मूल्ये जपणारे लोकच खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान आणि आदर्श ठरतात. एक उत्तम व्यक्तिमत्त्व घडविण्याची किंमत फार मोठी असते, आणि समाजात त्यालाच खरी प्रतिष्ठा मिळते.
जर तुमची जवळची माणसं तुमच्यापासून दूर गेली असतील, तर त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. आधार देणं किंवा मदत मागणं यात कधीही कमीपणा मानू नका. जोपर्यंत माणूस जिवंत आहे, तोपर्यंत त्याला आधाराची गरज असतेच. त्यामुळे तुटलेली नाती पुन्हा जोडण्याचा—प्रेम आणि आपुलकीने—प्रयत्न करा; आणि किमान संवाद तरी कायम ठेवा.
लेखिका : स्वाती प्रल्हाद आहेर
वाकी बुद्रुक, ता. चांदवड, जि. नाशिक
( इयत्ता १२ वीची परीक्षा दिलेली असून सद्या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. मी स्वतः हे पुस्तक पन तीचे हलीच प्रकाशित झाले आहे.)
