घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा सविस्तर वृत; आजपासून महाकाली यात्रेची सुरुवात; वाहतुकीत मोठे बदल!
चंद्रपूर : आज मंगळवार (दि. 24) पासून चंद्रपूर येथे माता महाकाली यात्रा सुरू होत असून यात्रेदरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक व यात्रेकरू येत असल्याने जटपुरा गेट परिसरात नेहमीच गर्दी होत असते. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना आखल्या आहेत.
महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 33 (1) (ब) नुसार पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी 24 मार्च ते 4 एप्रिल 2026 या कालावधीत शहरातील रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी व नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत.
या कालावधीत अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल वगळता सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. तसेच अंचलेश्वर गेट ते बागला चौक, अंचलेश्वर गेट ते कोहिनूर तलाव मार्ग तसेच महाकाली मंदिर पार्किंग ते आर. के. चौक परिसर ‘नो पार्किंग’ व ‘नो हॉकर्स झोन’ घोषित करण्यात आला आहे. महाकाली मंदिरासमोरील गौतम नगरकडे जाणारा रस्ताही सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे.
पर्यायी मार्गांची व्यवस्था :
बागला नगर, महाकाली वार्ड व भिवापूर वार्ड येथील नागरिकांनी शहरात ये-जा करण्यासाठी भिवापूर–हनुमान खिडकी–दादमहल मार्गाचा वापर करावा. हा मार्ग दुचाकी व ऑटो रिक्षांसाठीच खुला राहील. चारचाकी वाहनांसाठी लालपेठ कॉलरी–पठाणपुरा गेट–गांधी चौक हा मार्ग सुचविण्यात आला आहे. शहराबाहेर जाणाऱ्यांनी कामगार चौक मार्गे बायपास रोडचा वापर करावा.
पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे :
कोहिनूर तलाव मैदान येथे कार व जिप पार्किंगची सुविधा असेल (जड वाहनांना प्रवेश नाही). इंजिनिअरिंग कॉलेज ते भिवापूर मार्केट रस्त्यावर तेलंगणा व आंध्रप्रदेशातून येणाऱ्या बससाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. डी.एड. कॉलेज मैदान, न्यू इंग्लिश हायस्कूल मैदान, बैलबाजार पार्किंग क्रमांक 1 व 2 तसेच बायपास रोडवरील नायरा पेट्रोल पंप येथे विविध वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
या बदलांची अंमलबजावणी सुरळीत पार पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.
