वाशीममध्ये देहदान-अवयवदान जनजागृतीसह भव्य मोफत आरोग्य शिबिर; जनार्दन मगर यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा
वाशीम : हिरासिंग राठोड - विशेष प्रतिनिधी : समाजसेवेची अखंड परंपरा जपणारे व देहदान संकल्पदाता श्री जनार्दन कृष्णाजी मगर यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त “सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा” वाशीम येथे दि. २४ मार्च २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने देहदान व अवयवदान जनजागृती अभियानासह भव्य मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गीताई वुमन काईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे यांच्या पुढाकारातून कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालय, आमखेडा, श्री संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशीम व जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयात पार पडणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजात देहदान व अवयवदानाबाबत सकारात्मक विचार रुजवणे तसेच नागरिकांमध्ये आरोग्य जनजागृती करणे हा आहे. शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्वसामान्य नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, आजारांवरील मार्गदर्शन व उपचार सल्ला दिला जाणार आहे.
मगर यांनी आयुष्यभर समाजहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्यांच्या सेवाभावी कार्याचा आदर्श घेऊन नागरिकांनी देहदान व अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमाला वाशीमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
