Top News

लोकसेवक नंदकिशोर वाढई यांची राजीव गांधी पंचायत राज काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

लोकसेवक नंदकिशोर वाढई यांची राजीव गांधी पंचायत राज काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती


कळमना ग्रामपंचायतीच्या विकासकामांची हायकमांडकडून दखल




राजुरा : मनोज श्रीहरी गोरे | उपजिल्हा प्रतिनिधी | : कळमना येथील आदर्श स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांची राजीव गांधी पंचायत राज काँग्रेस कमिटी, चंद्रपूर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथील राजीव गांधी पंचायत राज संघटनेने ही नियुक्ती केली असून, तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या कार्याची ही मोठी पावती मानली जात आहे.

सरपंच नंदकिशोर वाढई यांनी ग्रामपंचायत कळमना येथे विविध विकासकामे, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून कळमना गावाला स्वतंत्र ओळख मिळवून दिली आहे. स्मार्ट ग्रामपंचायत कळमना येथील उपक्रमांची दखल केवळ जिल्हा नव्हे तर राज्यस्तरावर घेण्यात आली असून, आर. आर. पाटील सुंदर ग्राम योजना अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान कळमनाने पटकावला आहे.

ग्रामपंचायत कळमना येथे स्वच्छता अभियान, बंदिस्त गटारे, प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक उपक्रम, सुरक्षेसाठी लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरे, सर्व शासकीय इमारतींवर सोलर प्रणाली, हर घर सोलर योजना, स्मशानभूमीत ऑक्सिजन पार्क, उत्कृष्ट शाळा, स्मार्ट अंगणवाडी, ज्येष्ठ नागरिक पार्क, बालोद्यान, मायेची बाग असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.

तसेच घरोघरी महिलांच्या नावाने पाटी लावा अभियान, रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडे, बोलक्या भिंती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पंचतत्त्वांवर आधारित टाकाऊ वस्तूंपासून देखावे उभारण्यात आले. जुन्या सायकलींपासून सेल्फी पॉईंट, सीमारेषेवर लढणाऱ्या जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी रणगाडा व बुलेटचे देखावे हे विशेष आकर्षण ठरले आहेत.

ग्रामपंचायतीतील शासकीय संस्था, अंगणवाडी व शाळांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, प्रधानमंत्री, मोदी, रमाई, यशवंतराव चव्हाण, छबरी घरकुल योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, संजय गांधी निराधार योजना तसेच कृषी व विद्यार्थी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या सर्व कामांमुळे नंदकिशोर वाढई यांची परिसरात प्रामाणिक, लोकाभिमुख लोकसेवक म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

आपल्या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना नंदकिशोर वाढई म्हणाले की, “माझ्यासारख्या सामान्य सरपंचाला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन काँग्रेस पक्षाने तळागाळातील कार्यकर्त्यांची दखल घेतली आहे. मला दिलेली संधी मी देवमाणूस समजून जनतेची सेवा व काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी निश्चितच उपयोगात आणेन.”

यावेळी त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या खासदार सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय पवार, महाराष्ट्र प्रभारी नारायणभाई राठोड, प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे, खासदार प्रतिभाताई धानोरकर तसेच जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांचे मनःपूर्वक आभार मानले.


Previous Post Next Post