Top News

महापालिका निवडणुकीत भाजपला धक्का; प्रचार गीतावर निवडणूक आयोगाची बंदी

 महापालिका निवडणुकीत भाजपला धक्का; प्रचार गीतावर निवडणूक आयोगाची बंदी


मुंबई :  महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षास मोठा धक्का बसला असून, राज्य निवडणूक आयोगाने भाजपच्या एका प्रचार गीतावर थेट बंदी घातली आहे. आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका ठेवत आयोगाने हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा निर्णायक टप्प्यावर प्रत्येक राजकीय पक्ष प्रचारासाठी सर्व ताकद पणाला लावत असताना भाजपसाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी खास तयार करण्यात आलेले हे प्रचार गीत वापरण्यास आयोगाने स्पष्ट नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रचार गीतामध्ये ‘भगवा’ या शब्दाचा वापर करण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार धार्मिक भावना भडकवणारे शब्द, चिन्हे अथवा विशिष्ट रंगांचा थेट राजकीय प्रचारासाठी वापर करण्यास मनाई आहे. याच कारणावरून आयोगाने या गीतावर आक्षेप नोंदवला आहे.

आयोगाच्या निरीक्षणानुसार, गीतातील शब्दप्रयोग आचारसंहितेच्या चौकटीत बसत नसल्याने हे गीत अधिकृत प्रचारासाठी वापरता येणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आलेल्या या निर्णयामुळे भाजपच्या प्रचार रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे हे प्रचार गीत अत्यंत भव्य स्वरूपात तयार करण्यात आले होते. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात हे गीत रेकॉर्ड करण्यात आले होते. सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म तसेच प्रचार सभांमधून हे गीत मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा मानस होता. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ही योजना अडचणीत आली आहे.

दरम्यान, मुंबईसह राज्यभरात महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराची जोरदार धामधूम सुरू आहे. गल्लीबोळातील छोट्या बैठका ते मोठ्या जाहीर सभांपर्यंत सर्वच पक्ष सक्रिय असून सोशल मीडिया व डिजिटल प्रचारावर विशेष भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत भाजप या गीतात बदल करून पुन्हा परवानगी मागणार की पर्यायी प्रचार माध्यमांचा अवलंब करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे निवडणूक आयोग आचारसंहिता अंमलबजावणीत किती कठोर आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Previous Post Next Post