Top News

ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश! चंद्रपूर पोलिसांची थरारक कारवाई; मुंबईचा तस्कर अटकेत....

ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश! चंद्रपूर पोलिसांची थरारक कारवाई; मुंबईचा तस्कर अटकेत....


२०२५ मध्ये आतापर्यंत १५७ गुन्हे, १९२ आरोपी अटकेत — चंद्रपूर पोलिसांचा “ड्रग फ्री कॅम्पेन” प्रभावी




चंद्रपूर | चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज तस्करीवर मोठी कारवाई करत मुंबई येथील वसीम इमदाद खान (वय ३७) या आरोपीस अटक करून तब्बल ५२८ ग्रॅम एम.डी. पावडर आणि एकूण ३५,०७,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


रविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी साधारण २ वाजताच्या सुमारास पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी वसीम खान हा मुंबईहून कार क्र. एमएच-१० ईक्यू-०४२१ द्वारे चंद्रपूरात एम.डी. पावडर विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार साखरवाही फाट्याजवळील एच.पी. पेट्रोलपंपासमोर सापळा रचण्यात आला. पोलिसांनी आरोपीला वाहनासह ताब्यात घेतलं असता त्याच्याकडून एका प्लास्टिक पिशवीत ५२८ ग्रॅम एम.डी. सदृश्य पांढरी पावडर मिळाली. बाजारभावानुसार या अंमली पदार्थाची किंमत २६ लाख ४० हजार रुपये एवढी असून, रोख रक्कम, मोबाईल आणि कारसह एकूण ३५ लाख ७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुनील गोहोकार, इम्रान खान, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, हिरालाल गुप्ता, शशांक बदामवार, किशोर वाकाटे, विजयमाला वाघमारे व प्रमोद डंभारे सह सायबर पोलीस स्टेशन यांनी केली.


२०२५ मध्ये अंमली पदार्थविरोधी मोहिमेत चंद्रपूर पोलिसांचा मोठा यश


▪️चंद्रपूर जिल्ह्यात सन २०२५ मध्ये एन.डी.पी.एस. कायद्यानुसार १५७ गुन्हे नोंदवून १९२ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, एकूण ८० लाख ५९ हजार ७७४ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

▪️गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात २६ गुन्हे, ५५.२४ किलो गांजा जप्त, ४० आरोपींवर कारवाई, एकूण किंमत ६.६२ लाख रुपये.

▪️एम.डी. ड्रग्ज प्रकरणात १४ गुन्हे, ७२२.६१४ ग्रॅम एम.डी. पावडर जप्त, ३१ आरोपी अटकेत, मुद्देमाल ४३.७८ लाख रुपये.

▪️ब्राउन शुगर प्रकरणात १ गुन्हा, २९८ ग्रॅम पावडर जप्त, २ आरोपींवर कारवाई, मुद्देमाल ३०.१९ लाख रुपये माल जप्त करण्यात आला.

▪️ १५६ गुन्ह्यांत १८६ आरोपींवर अंमली पदार्थ सेवन प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.


"ड्रग फ्री चंद्रपूर" अभियान


चंद्रपूर पोलिसांच्या "नशामुक्त अभियान" अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.

▪️शाळा, महाविद्यालयांत “Say No To Drugs, Yes To Life” व्याख्याने

▪️सायकल रॅली, ध्यानशिबीर, पोस्टर आणि निबंध स्पर्धा

▪️गणेशोत्सव व नवरात्र काळात जनजागृती फलक

▪️होमगार्ड, स्वयंसेवक संघटना, युवा मंडळे आणि महिला समितीचा सहभाग

१५ ऑगस्ट २०२५ रोजी पालकमंत्री अशोक उइके यांच्या हस्ते नशामुक्ती अभियानाचे फ्लेक्स अनावरण करण्यात आले होते.


जनतेस आवाहन

चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी आवाहन केले आहे की, अंमली पदार्थ विक्री किंवा साठा संबंधी कोणतीही माहिती असल्यास डायल ११२ किंवा मोबाईल क्रमांक ७८८७८९०१०० वर संपर्क साधावा.आपली ओळख गुप्त ठेवण्यात येईल.

Previous Post Next Post