Top News

जनकापूर वाघ हल्ला : मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला वनविभागाकडून तातडीची आर्थिक मदत; वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी आमदार बंटी भांगडिया यांची सूचना

 


नागभीड |  नागभीड तालुक्यातील जनकापूर येथे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकरी रमेश पा. काशिवार (वय ५५) यांच्या कुटुंबाला वनविभागाकडून तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. ही मदत त्यांच्या मुलगा राहुल काशिवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली असून, उर्वरित मदत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.

४ ऑगस्ट रोजी जंगलालगतच्या शेतात धान पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या रमेश काशिवार यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला होता. सायंकाळपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता ते शेतात मृतावस्थेत आढळून आले. या घटनेने जनकापूरसह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेनंतर चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बंटी भांगडिया यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जनकापूर परिसरातील वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या. नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रभावी उपाययोजना त्वरित राबविण्याची मागणी त्यांनी केली.

वनविभागाने मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत दिली असून, शासनाच्या नियमानुसार उर्वरित नुकसानभरपाईची रक्कम आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर वितरित करण्यात येणार आहे.

यावेळी  ब्रह्मपुरी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक (ACF) अरविंद कुमार, नागभीड वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) भारती बगमारे,जिल्हा परिषद माजी सदस्य संजय गजपुरे  यांच्यासह वनविभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात मानवांवरील वाघांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने जनकापूर परिसरात वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, वनगस्त वाढवावी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


Previous Post Next Post