Top News

मारईपाटण गंगामाता देवस्थानाला 'ब' वर्ग ग्रामीण यात्रास्थळाचा दर्जा; शासनाचा GR जारी, विकासासाठी निधीचा मार्ग मोकळा



जिवती | चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील जिवती तालुक्यातील गंगामाता मारईपाटण देवस्थानाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत 'ब' वर्ग ग्रामीण यात्रास्थळाचा अधिकृत दर्जा देण्याचा शासन निर्णय (GR) महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 31 जुलै 2026 रोजी जारी केला आहे. या निर्णयामुळे देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार, यापूर्वी प्राप्त झालेल्या प्रस्तावाची राज्यस्तरीय समितीने 28 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या बैठकीत छाननी केली होती. त्यानंतर आवश्यक निकषांची पूर्तता झाल्याने मारईपाटण देवीचे मंदिर, ता. जिवती, जि. चंद्रपूर या यात्रास्थळाला 'ब' वर्ग ग्रामीण यात्रास्थळाचा दर्जा मंजूर करण्यात आला आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान

जिवती तालुक्यातील गंगामाता मारईपाटण देवस्थान हे विदर्भ, मराठवाडा आणि शेजारच्या तेलंगणा राज्यातील लाखो भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. दरवर्षी होळीनंतर येथे चंद्रपूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा भरते. यात्रेदरम्यान लाखो भाविक दर्शनासाठी येत असले तरी, परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत होता.

सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश : आमदार देवराव भोंगळे

या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी सोशल मीडियावरील संदेशात म्हटले आहे की, जिवती तालुक्याची निर्मिती होऊन दोन दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी सीमावर्ती आणि दुर्गम भागातील हे महत्त्वाचे देवस्थान विकासापासून वंचित राहिले होते. राजुरा विधानसभेचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर या देवस्थानाच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेंतर्गत देवस्थानाला 'ब' वर्ग ग्रामीण यात्रास्थळाचा अधिकृत दर्जा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

कोणत्या सुविधा होणार विकसित?

'ब' वर्ग ग्रामीण यात्रास्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून देवस्थान परिसरात विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये –

  • प्रशस्त अंतर्गत व संपर्क रस्ते
  • शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
  • सुसज्ज भक्तनिवास
  • आधुनिक स्वच्छतागृहे
  • पथदिवे व प्रकाश व्यवस्था
  • यात्रेदरम्यान आवश्यक मूलभूत सुविधा
  • यांसारख्या विकासकामांना प्राधान्य दिले जाणार आहे.
  • पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना

या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच सीमावर्ती जिवती तालुक्यातील स्थानिक रोजगार, व्यापार आणि लघुउद्योजकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच देवस्थानाला राज्याच्या धार्मिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळण्यास मदत होणार आहे.

आमदार देवराव भोंगळे यांनी हा निर्णय जिवती तालुक्यातील नागरिक आणि गंगामातेच्या लाखो भाविकांना समर्पित करत सर्वांचे अभिनंदन केले असून, "जय गंगा, जय बारुला माता!" असा संदेशही दिला आहे.




Previous Post Next Post