Top News

Nagpur : महागाई-गुन्हेगारीवरून नागपुरात संतापाचा स्फोट; विराआसच्या रस्ता रोकोने वाहतूक ठप्प, 17 कार्यकर्ते ताब्यात



नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांमुळे वाढलेली महागाई आणि नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी गणेशपेठ बसस्थानकासमोर तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली असून पोलिसांनी 17 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

आंदोलनापूर्वी कार्यकर्त्यांनी गणेशपेठ बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलन करत केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जीवनावश्यक वस्तू, इंधन, घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींविरोधात तसेच नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारला धारेवर धरत आंदोलनकर्त्यांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

घोषणाबाजीनंतर आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर उतरून ‘रस्ता रोको’ सुरू केला. काही सरकारी आणि खासगी बसेस अडवून धरल्यामुळे गणेशपेठ परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे 200 मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवासी आणि वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.



आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मोठी धावपळ उडाली. पोलिसांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले; मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना हटविण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर आंदोलकांना पोलीस वाहनांमध्ये बसवून घटनास्थळावरून हटविण्यात आले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या 17 प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये युवा आघाडी विदर्भ प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर, नागपूर शहराध्यक्ष नरेश निमजे, महिला अध्यक्षा ज्योती खांडेकर, युवा आघाडी शहराध्यक्ष गिरीश तितरमारे, जया चातुरकर, माधुरी चौहान, हरि पानबुडे, कांचन करांगळे, चंद्रशेखर पुरी, भरत बाविस्टाले, रहमान शेख, सुनील खांडेलवाल, तारेश दुरुगकर, मनीषा पुरी, लता अवजेकर, नीलकंठ अंभोरे आणि विलास सूर्यवंशी यांचा समावेश होता. 



आंदोलनादरम्यान मुकेश मासुरकर यांनी नागपूर शहर देशातील गुन्हेगारीच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आल्याबद्दल चिंता व्यक्त केली. नागरिकांच्या जीवित, स्वातंत्र्य आणि मालमत्तेचे संरक्षण करणे ही राज्य सरकारची मूलभूत घटनात्मक जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्र शासन आणि गृहविभाग या जबाबदारीत अपयशी ठरल्याचा आरोप केला. तसेच मुख्यमंत्री यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

महागाईवर नियंत्रण मिळविणे आणि नागपूरमधील कायदा व सुव्यवस्था सुधारणे यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने देण्यात आला.

या आंदोलनात नागपूर शहर समन्वयक राहुल बन्सोड, श्याम अवथडे, वसंतराव वैद्रद्य, विठ्ठल मानकर, रामखीलावन बैरागी, संजय चौधरी, असरफ अली, रामेश्वर मोहबे, अक्षय लाड, शालिनी खडसे, अमोल रडके यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Previous Post Next Post