Top News

संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, येथील ४८ विद्यार्थ्यांचे संशोधन प्रस्ताव सादर

 





वाशिम : संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम येथील विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (ICMR) Short Term Studentship — STS अंतर्गत संशोधन प्रोटोकॉल सादर केले, तर २३ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या Short Term Research Grant — STRG अंतर्गत संशोधन प्रस्ताव सादर केले आहेत.

सदर संशोधन उपक्रम महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सतीन मेश्राम यांच्या मार्गदर्शन व पाठबळाखाली राबविण्यात आला.



 जन औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना संशोधन विषय निवडणे, उद्दिष्टे निश्चित करणे, अभ्यास पद्धती तयार करणे, प्रश्नावली विकसित करणे व संशोधन प्रस्ताव तयार करणे यासाठी विभागातील शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील विविध विभागांतील शिक्षकांचेही या उपक्रमात सहकार्य लाभले.

वैद्यकीय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचारसरणी आणि समाजाभिमुख दृष्टिकोन विकसित व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

 विद्यार्थ्यांनी तयार केलेले संशोधन प्रस्ताव स्थानिक आरोग्य समस्या समजून घेण्यासाठी, पुराव्यावर आधारित उपाययोजना सुचविण्यासाठी तसेच समाजाच्या आरोग्य संरक्षण व कल्याणासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

महाविद्यालय प्रशासन, अधिष्ठाता डॉ. सतीन मेश्राम, जन औषध वैद्यकशास्त्र विभाग व इतर सर्व विभागांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होत असून, भविष्यात गुणवत्तापूर्ण व समाजोपयोगी वैद्यकीय संशोधनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 

विशेष प्रतिनिधी - हिरासिंग राठोड - 9511729176
Previous Post Next Post