बल्हारशाह : पर्यावरण संवर्धन, अक्षय ऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत बल्हारशाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BIT), बल्हारशाह येथील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी "Waste to Electricity Generation Using Flame-Driven Solar Energy Conversion" या विषयावरील मिनी प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
या प्रकल्पाची निर्मिती मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी रोहित बिस्वास, मोहम्मद हुझैर आणि अमन सिंह यांनी केली. कचऱ्याचा आणि सौर उष्णतेचा प्रभावी वापर करून वीज निर्मिती करण्याची अभिनव संकल्पना या प्रकल्पातून सादर करण्यात आली आहे. ऊर्जा निर्मितीच्या पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प भविष्यातील शाश्वत तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या प्रकल्पासाठी मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख आणि प्रोजेक्ट गाईड प्रा. प्रशांत वाळके यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, नवोपक्रमाची दृष्टी आणि तांत्रिक कौशल्यांचा विकास घडवून आणण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष संजय वासाडे, प्राचार्य डॉ. रजनीकांत मिश्रा, डीन अकॅडमिक्स डॉ. सत्यनारायण आणि डीन रिसर्च डॉ. झेड. जे. खान यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना संशोधन, नवोपक्रम आणि प्रकल्पाधारित शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीत विभागातील प्राध्यापक भगवत ढेकवार, जाहिद अंसारी, विपीन दाभेरे, स्नेहल बेसेकर, अविनाश खंडेराव आणि सतीश जाधव तसेच अशैक्षणिक कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य आणि प्रयोगशाळेतील सुविधांमुळे हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकला.
कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीच्या संकल्पनेला चालना देणारा हा प्रकल्प BIT बल्हारशाहच्या गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम आणि शाश्वत तांत्रिक विकासाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक मानला जात आहे.
