Top News

नागभीड नगर परिषदेत स्वच्छतेचा बोजवारा; नाला सफाई, कचरा व्यवस्थापनावर भाजपचा हल्लाबोल

पावसाळ्यापूर्वी शहरातील अस्वच्छतेवर विरोधक आक्रमक; प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा


नागभीड, १२ जून : पावसाळा तोंडावर असताना नागभीड नगर परिषद क्षेत्रातील स्वच्छता व्यवस्था ढासळल्याचा आरोप करत भाजपने नगर परिषद प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरासह नगर परिषदेत समाविष्ट गावांमध्ये नाल्या गाळ व कचऱ्याने भरल्या असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 



भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांची भेट घेऊन विविध समस्यांबाबत निवेदन सादर केले. नाला सफाई, कचरा व्यवस्थापन, मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. 



विरोधी पक्षाच्या म्हणण्यानुसार, शहरातील अनेक नाल्यांची नियमित सफाई होत नसल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याचा आणि नागरिकांच्या घरांमध्ये शिरण्याचा धोका वाढला आहे. दुसरीकडे, घरगुती कचरा संकलनासाठी असलेल्या घंटागाड्या वेळेवर आणि नियमित फिरत नसल्याने विविध भागांत कचरा साचून राहत आहे. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे.

शहरातील तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कडेला वाढलेली झाडे-झुडपे, मोकाट डुकरे आणि जनावरांचा वाढता त्रास यामुळे नागरिकांना दैनंदिन अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नगर परिषद क्षेत्रातील अनेक गावांमध्ये मूलभूत नागरी सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी भाजप गटनेते गणेश तर्वेकर, नगरसेवक सचिन आकुलवार, अवेश पठाण, प्रिया लांबट, शिल्पा शेंडे, हेमंत नन्नावरे तसेच स्वीकृत नगरसेवक डॉ. अमीर धमानी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

“पावसाळ्यापूर्वी नाला सफाई, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही नगर परिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे,” अशी टीका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

दरम्यान, नागभीड शहर आणि परिसरातील गावांमध्ये स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.

Previous Post Next Post