Top News

नागभीड नगर परिषदेत नियमभंगाचा गंभीर आरोप; भाजप गटनेते गणेश तर्वेकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

 



नागभीड, प्रतिनिधी : नागभीड नगर परिषदेचा कारभार महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम, 1965 च्या तरतुदींना बगल देऊन सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजप गटनेते तथा नगरसेवक गणेश जे. तर्वेकर यांनी केला आहे. यासंदर्भात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसह त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून चौकशी व संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 च्या कलम 81(1) नुसार दर महिन्याला किमान एक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. मात्र नागभीड नगर परिषदेची शेवटची सर्वसाधारण सभा 10 एप्रिल 2026 रोजी झाल्यानंतर नियमानुसार पुढील सभा घेण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या, विकासकामे आणि प्रशासनाशी संबंधित महत्त्वाचे विषय सभागृहात मांडण्याची संधी मिळत नसल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे.

दरम्यान, शहरातील स्वच्छता, नाला सफाई, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था तसेच मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पावसाळा तोंडावर असतानाही अनेक ठिकाणी नाल्यांची सफाई अपूर्ण असून कचऱ्याचे ढिगारे कायम असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जनतेत तीव्र नाराजी पसरल्याचा आरोपही करण्यात आला.

विरोधी पक्षाने नगर परिषद क्षेत्रात लागू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात करण्यात आलेल्या विविध विकासकामे, उद्घाटने आणि प्रशासकीय निर्णयांबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन झाले का, याची चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच नगर परिषदेच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असून अनेक महत्त्वाच्या विषयांची माहिती नगरसेवकांना दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याने महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

"नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा टाळण्यासाठी सर्वसाधारण सभा वेळेत घेतल्या जात नसतील तर हा लोकशाही व्यवस्थेवरच घाला आहे," असा घणाघात गटनेते गणेश तर्वेकर यांनी केला. नगर परिषद प्रशासनाने अधिनियमातील तरतुदी आणि निवडणूक आचारसंहितेचे नियम पाळणे बंधनकारक असून जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

निवेदन सादर करताना गटनेते गणेश तर्वेकर यांच्यासह नगरसेवक अवेश पठाण, सचिन आकुलवार, हेमंत नन्नावरे, शिल्पा विनय शेंडे आणि प्रिया राहुल लांबट उपस्थित होते.



Previous Post Next Post