कल्याण, प्रतिनिधी : कवी कट्टा कल्याण मुंबईच्या वतीने आयोजित सामाजिक प्रबोधनपर कवी संमेलन विजयनगर येथील गुलमोहर कॉलनी, कल्याण पूर्व येथे उत्साहात पार पडले. ज्येष्ठ कवी शाम बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या काव्य मैफलीत समाजप्रबोधन, संस्कार, शिक्षण, सामाजिक जाणीवा आणि समकालीन विषयांवर आधारित दर्जेदार कवितांचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवी अशोक भवार, कवी कट्टा कल्याण मुंबईचे अध्यक्ष नवनाथ रणखांबे तसेच सार्थक साहित्य प्रकाशनच्या प्रकाशिका प्रा. आशा रणखांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी साहित्याच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार रुजविण्याची गरज अधोरेखित केली.
कवी संमेलनात सहभागी कवींनी विविध सामाजिक विषयांवर प्रभावी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमादरम्यान साहित्य, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम अनुभवायला मिळाला. उपस्थित रसिकांनी कवींच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कवी कट्टा कल्याण मुंबईच्या या उपक्रमामुळे साहित्यिक चळवळीला बळ मिळत असून सामाजिक प्रबोधनासाठी कविता हे प्रभावी माध्यम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
