महिलांमधील गर्भाशयमुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगाचे लवकर निदान व्हावे आणि त्याबाबत जनजागृती वाढावी या उद्देशाने लेडी हार्डिंग संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पॅप स्मीअर तपासणी सेवा सुरू करण्यात आली आहे.
पॅप स्मीअर ही एक सोपी, सुरक्षित व वेदनारहित तपासणी पद्धत असून रुग्णाला कोणताही अपाय होत नाही. या तपासणीद्वारे गर्भाशयमुखातील कर्करोगपूर्व बदल तसेच कर्करोगाचे प्रारंभिक अवस्थेत निदान करणे शक्य होते. त्यामुळे वेळेवर उपचार सुरू करून आजाराचे गंभीर परिणाम टाळता येतात.
तज्ज्ञांच्या मते, 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिलांनी नियमितपणे पॅप स्मीअर तपासणी करून घ्यावी. 21 ते 29 वर्षे वयोगटातील महिलांनी दर तीन वर्षांनी पॅप स्मीअर चाचणी करणे शिफारसीय आहे. 30 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दर तीन ते पाच वर्षांनी तपासणी करून घ्यावी. विशेषतः विवाहित महिला, लैंगिकदृष्ट्या सक्रिय महिला तसेच कुटुंबात गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा इतिहास असलेल्या महिलांसाठी ही तपासणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
महिलांनी नियमित आरोग्य तपासणीचा भाग म्हणून पॅप स्मीअर चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे महिलांच्या आरोग्य सेवांना बळकटी मिळणार असून सर्व्हायकल कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
विशेष प्रतिनिधी - हिरासिंग राठोड - 9511729176
