Top News

बल्लारपूरमध्ये 150 कोटींचे टिंबर म्युझियम व झायलरियम; सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

बल्लारपूरमध्ये 150 कोटींचे टिंबर म्युझियम व झायलरियम; सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन




बल्लारपूर |  बल्लारपूर येथे 150 कोटी रुपयांच्या भव्य टिंबर म्युझियम व झायलरियम प्रकल्पाला लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. विधानसभेतील अर्धा तास चर्चेदरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी ही मागणी जोरदारपणे मांडली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत वनमंत्री गणेश नाईक यांनी हा प्रकल्प अर्थसंकल्पात समाविष्ट करून साकार केला जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.

बल्लारपूर हे विपुल वनसंपदा आणि दर्जेदार सागवान लाकडासाठी देश-विदेशात ओळखले जाते. येथील सागवान लाकडाचा वापर अयोध्येतील राम मंदिर, संसद भवन आणि भारत मंडपमसारख्या महत्त्वाच्या वास्तूंमध्ये झाल्याचा उल्लेख करत मुनगंटीवार यांनी या शहराच्या ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्वावर प्रकाश टाकला. जागतिक स्तरावर लाकूड संशोधन संस्था उभारल्या जात असल्याचे उदाहरण देत, बल्लारपूरमध्येही आधुनिक संशोधन व पर्यटन केंद्र उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

प्रस्तावित प्रकल्पासाठी सुमारे 65 हेक्टर जागा उपलब्ध असून, ‘राम-लक्ष्मण’ नावाने ओळखले जाणारे ऐतिहासिक लाकूड, भामरागड परिसरातील जीवाश्म, 32 दुर्मिळ लाकूड प्रजाती तसेच वनसंवर्धन, हवामान बदल आणि पर्यावरण शिक्षणासंबंधी माहितीचे जतन या म्युझियममध्ये करण्यात येणार आहे.

या टिंबर म्युझियम व झायलरियममुळे बल्लारपूर राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे उभे राहील. अभ्यासक, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी हे केंद्र आकर्षण ठरेल. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगारनिर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. लाकूडशास्त्र, वनसंवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरेल.

वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत स्पष्ट भूमिका मांडताना हा प्रकल्प काळाची गरज असल्याचे नमूद केले. उपलब्ध जागा, संशोधनाच्या संधी आणि पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प साकार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

एकूणच, 150 कोटींचा हा प्रकल्प विदर्भातील वनसंपदा, संशोधन, पर्यटन आणि स्थानिक विकासाला मोठी चालना देणारा ठरणार आहे.

Previous Post Next Post