Top News

३० जूनपर्यंत कर्जमाफी नाही तर १ जूनपासून महाराष्ट्रात रेल्वेचे एकही चाक फिरू देणार नाही

३० जूनपर्यंत कर्जमाफी नाही तर १ जूनपासून महाराष्ट्रात रेल्वेचे एकही चाक फिरू देणार नाही


मिंथूर–नागभीड पायदळ आक्रोश मोर्चात बच्चू कडू यांचा सरकारला थेट इशाराकडू




नागभीड | मिंथूर येथील शेतकरी रोशन शिवदास कुळे यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ तसेच सावकारशाही, कर्जमाफी, धान खरेदी व किडनी विक्रीस भाग पाडणाऱ्या व्यवस्थेविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मिंथूर ते नागभीड पायदळ आक्रोश मोर्चा आज दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी काढण्यात आला.

या भव्य लाॅंगमार्चमध्ये माजी आमदार विराआंस अध्यक्ष वामनराव चटप, सतिश वारजूकर, विनोद झोडगे, गिरीश नवघडे, राहुल पांडव यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.मोर्चादरम्यान झालेल्या सभेत बोलताना बच्चू कडू यांनी सरकार व प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.ते म्हणाले,“१०० किलो कच्चा माल टाकून ८० किलो उत्पादन काढणारा कारखानदार सावकार बनतो, मग एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी गरीब का राहतो? शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो म्हणून आम्ही अपराधी झालो काय?”



कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करताना त्यांनी थेट इशारा दिला.

“मुख्यमंत्री अजूनही कर्जमाफीचा विषय डोक्यावर घेत नाहीत. ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, तर १ जूनपासून महाराष्ट्रात रेल्वेचे एकही चाक धावू देणार नाही,” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले,

“शासकीय धान खरेदीला महिना होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत. बोनस, पाणी आणि वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.”


याच पार्श्वभूमीवर पुढील आंदोलनाची रूपरेषा जाहीर करताना बच्चू कडू म्हणाले,

“धान उत्पादक शेतकरी, वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी चार ते पाच जिल्ह्यांमध्ये दहा दिवसांची पायदळ यात्रा काढण्यात येणार आहे. प्रत्येक गावातून आमची टीम कामाला लागेल. या आंदोलनाला कुठल्याही पक्षाचा झेंडा लावला जाणार नाही.”

मिंथूर येथील शेतकरी रोशन शिवदास कुळे यांना सावकारांच्या कर्जफेडीसाठी ट्रॅक्टर, दुचाकी, साडेतीन एकर शेती विकावी लागली. एवढ्यावरही न थांबता स्वतःची किडनी विकण्याची वेळ त्यांच्यावर आली, तरीही कर्ज फिटले नाही. सावकारांच्या सततच्या तगाद्यामुळे अखेर त्यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माध्यमांतून हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यासह देशभरात खळबळ उडाली.या पार्श्वभूमीवरच शेतकऱ्यांना न्याय मिळावा व सावकारांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला विविध स्थानिक संघटना व नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला.

Previous Post Next Post