थलापती विजय यांची सिनेसृष्टीतून एक्झिट; ‘जन नायकन’ ठरणार अखेरचा चित्रपट.....३ दशकांच्या कारकिर्दीला पडदा; थलापती विजय अभिनयातून निवृत्त...
चैन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि चाहत्यांचा लाडका अभिनेता थलापती विजय यांनी सिनेसृष्टीतून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना भावूक केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या आपल्या आगामी चित्रपट ‘जन नायकन’ च्या ऑडिओ लाँच कार्यक्रमात विजय यांनी ही अधिकृत घोषणा केली. ‘जन नायकन’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरणार असून, यानंतर ते अभिनय क्षेत्रातून पूर्णतः दूर जाणार आहेत.
तीन दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या विजय यांनी असंख्य गाजलेले चित्रपट दिले. आपल्या सहज अभिनयशैली, सामाजिक आशय असलेल्या भूमिका आणि प्रेक्षकांशी असलेल्या घट्ट नात्यामुळे त्यांनी तामिळसह संपूर्ण देशात मोठा चाहतावर्ग निर्माण केला. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद हा त्यांच्या लोकप्रियतेचा ठोस पुरावा ठरला आहे.
निवृत्तीमागील भूमिका स्पष्ट करताना विजय यांनी सांगितले की, आता ते राजकारण आणि लोकसेवेकडे पूर्णवेळ लक्ष केंद्रित करणार आहेत. समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा आणि जनतेशी थेट जोडले जाण्याचा हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या निर्णयाचे अनेक राजकीय व सामाजिक स्तरातून स्वागत होत आहे.
दरम्यान, विजय यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये मिश्र भावना उमटल्या असून, सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या जात आहेत. ‘जन नायकन’ या चित्रपटाकडे आता त्यांच्या कारकिर्दीच्या समारोपाच्या दृष्टीने विशेष लक्ष लागले आहे.
सिनेसृष्टीला दिलेल्या अमूल्य योगदानासाठी थलापती विजय यांचे नाव कायम सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाईल, अशी भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे.
