Top News

देहदान व अवयवदानातून मानवतेचा सर्वोच्च संदेश; वाशीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम

देहदान व अवयवदानातून मानवतेचा सर्वोच्च संदेश; वाशीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम


वाशीम | हिरासिंग राठोड| वैद्यकीय शिक्षण, संशोधन तसेच गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देहदान व अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा जनजागृती कार्यक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशीम यांच्या वतीने मंगळवार, दि. 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

देहदान व अवयवदान हे केवळ वैद्यकीय क्षेत्रासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी मानवतेचे श्रेष्ठ कार्य असल्याचे मत या उपक्रमातून मांडले जाणार आहे. मृत्यूनंतरही कोणाच्या तरी जीवनात आशेचा किरण बनण्याची संधी देहदान व अवयवदानामुळे मिळते. समाजात सकारात्मक विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जीवनदानाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या विशेष कार्यक्रमास आमदार शामभाऊ खोडे, आमदार बाबुसिंग महाराज, तसेच मा. सौं. मोहिनीताई नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय वाशीम जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकारी, विविध धर्मांचे आदरणीय धर्मगुरू, सामाजिक, शैक्षणिक व स्वयंसेवी संघटनांचे प्रमुख यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले आहे.

कार्यक्रमात देहदानामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्ययनाची संधी कशी मिळते, तसेच अवयवदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन कसे प्राप्त होते, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची मार्गदर्शक भाषणे, उपस्थितांच्या शंकांचे निरसन तसेच देहदान व अवयवदान नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सर्व धर्म, जाती, पंथ यांच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या नात्याने देहदान व अवयवदानाचा विचार स्वीकारावा, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे. दि. 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मानवतावादी उपक्रमास पाठबळ द्यावे, असे विनम्र आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशीमचे डीन मा. डॉ. सतिन मेश्राम यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post