अतिवृष्टीने हवालदिल शेतकरी; जय विदर्भ पार्टीकडून मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांना निवेदन
नागपूर : संपूर्ण विदर्भात झालेल्या (Excess Rain) अतिवृष्टीमुळे कापूस (Cotton) , सोयाबीन, तूर, भाजीपाला तसेच संत्रा-मोसंबी बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडून कुजायला लागली असून रोगराई (Crop Diseases) व अळीचा प्रादुर्भाव (Pest Attack) वाढला आहे. शेतकऱ्यांसमोर कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण, आजारी आईवडिलांची देखभाल यासह अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.
याच पार्श्वभूमीवर जय विदर्भ पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांच्या नावे विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन देण्यात आले. अप्पर आयुक्त (महसूल) राजेश खवले यांनी हे निवेदन स्वीकारले.
निवेदनात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तात्काळ करून कापूस, सोयाबीन, तूर व भाजीपाला पिकांसाठी २५ हजार रुपये प्रती एकर, तर संत्रा-मोसंबी बागायतदारांसाठी ५० हजार रुपये प्रती एकर मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन पूर्ण करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय, कापूस आयातीवरील रद्द केलेला ११ टक्के आयातकर तसेच सोयाबीन कच्च्या तेलावरील कमी करण्यात आलेला ५० टक्के आयातकर पूर्ववत लावावा, अशीही भूमिका जय विदर्भ पार्टीने स्पष्ट केली.
विदर्भातील वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या सर्व मागण्यांची तात्काळ पूर्तता करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
निवेदन देताना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार, राष्ट्रीय उपाध्यक्ष रंजना मामर्डे, मुकेश मासुरकर, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. पी. आर. राजपूत, पॉलिटब्युरो सदस्य व नागपूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दौलतकार, नागपूर शहर अध्यक्ष प्रशांत नखाते, महासचिव नरेश निमजे, मध्य नागपूर अध्यक्ष रविन्द्र भामोडे, वाहतूक आघाडी जिल्हा अध्यक्ष अमूल साकुरे व डॉ. झेलम कटोच उपस्थित होते.
