आमदार श्रेयाच्या राजकारणात मश्गुल; शेतकरी, कामगार, नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष – सुभाष धोटे यांचा आरोप
राजुरा : “शेतकरी, कामगार आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर आमदार शांत बसले असून केवळ श्रेय घेण्याच्या राजकारणात मश्गुल आहेत,” अशी जोरदार टीका माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे यांनी केली.
राजुरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना धोटे यांनी प्रशासन व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर जनतेच्या प्रश्नांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याचा गंभीर आरोप केला.
धोटे म्हणाले, “अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त झाले तरी चंद्रपूर जिल्ह्याला भरपाईतून वगळले गेले. शेतकऱ्यांना सरसकट मदत न देता अन्यायकारक निकष लावले जात आहेत. खतांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले गेले आहे. जिल्ह्यात पाच आमदार असतानाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, ही शोकांतिका आहे. जर शासनाने लक्ष दिले नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल.”
मतदार चोरीवर थेट हल्ला
राजुरा मतदारसंघात ६८६१ नावे मतदारयादीतून वगळली गेली असून, एकट्या राजुरा शहरात ३१९५ बोगस नावे नोंदवली गेली. एवढे धक्कादायक प्रकार घडूनही जबाबदारांवर कार्यवाही झालेली नाही. “भाजपचे आमदार ‘वोट चोरीच झाली नाही’ असे सांगतात आणि दुसरीकडे तक्रारी दाखल केल्याचा दावा करतात. हा मतदारांचा घोर अपमान आणि बनवेगीरी आहे,” असे धोटे यांनी फटकारले.
श्रेयासाठी नागरिकांना वेठीस धरणे
धोटे यांनी आरोप केला की, सोनियानगर व इंदिरानगर घरकुल योजनेतील काँग्रेसकाळातील घरे आजही नागरिकांना दाखवली जात आहेत. पण सध्याचे आमदार त्याच घरांसाठी नवीन अर्ज मागवत आहेत. मृतकांच्या कुटुंबीयांना मदत देताना भाजप कार्यालयात दिवसभर बसवून स्टॅम्प पेपर बदलण्यास भाग पाडले. “शोकाकुल कुटुंबाचा अपमान करण्याइतकी नीच पातळीचे राजकारण सुरु आहे,” असे धोटे म्हणाले.
शहरातील इतर प्रश्न
विजेचा लपंडाव, बॅनर-पोस्टरमुळे शहराचे विद्रूपीकरण, महिलांचे आधार कार्ड गोळा करून कूपन वाटप, डीजे प्रकरणात निष्पाप मंडळांवर गुन्हे दाखल, अशा बिकट परिस्थितीत आमदार मात्र केवळ व्हॉट्सअॅप व मीडियाच्या गाजावाजातून श्रेय घेण्याचा आटापिटा करत असल्याचे धोटे यांनी सांगितले.
काँग्रेसच्या काळातील कामे आजही उपयोगी
धोटे यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसकाळात उपजिल्हा रुग्णालय, प्रशासकीय इमारती, ग्रामीण रुग्णालये, रस्ते, वाचनालये, सौंदर्यीकरण प्रकल्प अशा शेकडो विकासकामांना गती मिळाली. मात्र महायुती सरकार आल्यापासून राजुरा मतदारसंघातील कामे प्रलंबित ठेवली जात आहेत.
“जनतेच्या खरी प्रश्नांवर पडदा टाकून केवळ श्रेय घेण्याचे राजकारण काँग्रेस सहन करणार नाही. जनता सर्व पाहत आहे आणि योग्य वेळी उत्तरही देईल,” असा इशारा धोटे यांनी दिला.
पत्रकार परिषदेला अरुण धोटे, सुरज ठाकरे, रंजन लांडे, सुनील देशपांडे, निर्मला कुडमेथे, प्रभाकर येरणे, हरजित सिंग संधु, गजानन भटारकर, अँड. चंद्रशेखर चांदेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
