दीड लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य, चंद्रपूर - गडचिरोली ठरणार औद्योगिक हब
जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने कॉफी टेबल बुकचे अनावरण...
चंद्रपूर व गडचिरोली हे इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे ठरणार....
मुल | संदीप तेलंग | उपजिल्हा प्रतिनिधी : “चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकासाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या परिसरातून इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून दीड लक्ष लोकांना रोजगार मिळणार आहे. औद्योगिक विकासामुळेच समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुल (जि. चंद्रपूर) येथील विश्रामगृहात जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण करताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, “खनिज उत्खनन ज्या ठिकाणी होते, तेथील नागरिकांना खनिज निधीचा थेट फायदा झाला पाहिजे, हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. उत्खनन व वाहतुकीमुळे स्थानिकांना जो त्रास होतो, त्यासाठी निधीचा सर्वाधिक वाटा त्यांनाच मिळणे गरजेचे आहे.”
खनिज विकास निधीमधून चंद्रपूर जिल्ह्यात रोजगारनिर्मिती, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, कौशल्याधारित प्रशिक्षण व नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
फडणवीस पुढे म्हणाले की, “औद्योगिकरणासोबतच पर्यावरणाचे संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कौशल्य विकासावर भर देऊन स्थानिकांना 100 टक्के रोजगार देण्याची व्यवस्था आपण उभी करणार आहोत. चंद्रपूरने औद्योगिक विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून द्यावा.”
50 कोटी वृक्षलागवड मोहिमेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्याने यावेळीही वृक्षलागवडीचे मोठे उद्दिष्ट साध्य करावे. महाराष्ट्राने ग्रीन कव्हर वाढवले असून वनक्षेत्र 33 टक्क्यांच्या वर नेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले, तर आभारप्रदर्शन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मानले.




