नागभीड येथे चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, १७ पेट्या विदेशी दारू व वाहन जप्त
नागभीड : मध्य प्रदेशातून अवैधरित्या आणलेली परदेशी दारू चंद्रपूर जिल्ह्यात तस्करीसाठी नेण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दोन तस्करांना अटक केली. या कारवाईत एकूण ५ लाख ११ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की मध्य प्रदेशातून अवैध विदेशी दारू ब्रम्हपुरीकडे नेली जाणार आहे. त्यानुसार मौजा बाम्हणी रोडवर नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, संशयित वाहन आल्यानंतर त्याची झडती घेतली असता १५ पेट्या रॉयल स्टॅग विदेशी दारू (७२० बाटल्या, १८० एम.एल.) किंमत १,८७,००० रुपये तसेच २ पेट्या रॉयल स्टॅग विदेशी दारू (१९० बाटल्या, ९० एम.एल.) किंमत २४,००० रुपये असा माल मिळून आला. वाहनासह एकूण ५,११,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी प्रफुल प्रकार घरडे (३१, रा. हनुमान नगर, ब्रम्हपुरी) आणि अक्षय रुपचंद पिल्लेवार (२७, रा. देलनवाडी, ब्रम्हपुरी) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध नागभीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कॉक्रेडवार, बलराम झाडोकार, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, पोहवा जयंता चुनारकर, नितेश महात्मे, पोअं गणेश भोयर, प्रदीप मडावी, अजित शेन्डे व चापोहवा दिनेश अराडे यांच्या पथकाने केली.
