सक्षम व कार्यकुशल युवा पिढी घडविण्यास कटीबद्ध _ डॉ. अमीर धमानी
नागभीड : जनता शिक्षण संस्था, नागभीड चा ७४ वा वर्धापन दिन व संस्थेद्वारा संचालित जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व जनता काॅन्व्हेट स्कूल या या तिन्ही विद्यालयांचा वर्धापन दिन सोहळा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्वावर पार पडला, याप्रसंगी वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षेत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सुध्दा पार पडला.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या देशाला विकासाकडे नेण्याचे कार्य हे प्राधान्य क्रमाने शिक्षण क्षेत्राने केलेलं आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नागभीड व परिसरातील समाजसेवक, शिक्षण प्रेमी समविचारी लोकांनी एकत्रित येऊन जनता शिक्षण संस्थेची निर्मिती केली व त्याच माध्यमातून जनता विद्यालय व जनता कन्या विद्यालय या दोन ज्ञानरूपी मंदीरांची नागभीड नगरीत सुरुवात झाली, व २०१४ मध्ये पालकांच्या मागणीनूसार जनता काॅन्व्हेट ची निर्मिती झाली. गेली अनेक वर्षांपासून या विद्यालयांनी देशाकरीता सुजाण नागरिक घडवीण्याचे कार्य केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.अमीर धमानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव डॉ. रविंद्र कावळे, उपाध्यक्ष चक्रधर रोहणकर, सहसचिव रवींद्र समर्थ, प्राचार्य एस.टी कोरे , जनता कन्या चे प्र. प्राचार्य एस.डी.जाधव , माजी उपप्राचार्य बि.के चुटे, काॅन्व्हेट च्या मुख्याध्यापिका सिमा देशमुख , नागभीड चे प्रतीष्ठित व्यापारी जेष्ठ नागरिक रामदासजी गिरीपुंजे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या शुभपर्वावर मार्च २०२५ मध्ये झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यालयातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा जनता शिक्षण संस्थेचे वतिने रोख बक्षीस व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कन्या कनिष्ठ महाविद्यालयातून कला शाखेतून जिल्ह्यातून प्रथम येणारी विद्यार्थीनी कु. फाल्गुनी देवनाथ भोयर, वर्ग दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम येणारा विद्यार्थी शिव श्रिकांत राऊत व विज्ञान शाखेतून तालुक्यात प्रथम येणारा विद्यार्थी विहम हरीश लोणारे यांचा तसेच विविध शाखेतून व विविध विषयात प्राविण्य संपादीत केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी अहवाल वाचन प्राचार्य एस.डी.जाधव यांनी केले, संस्था सचिव डॉ.रवींद्र कावळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्था अध्यक्ष डॉ.अमीर धमानी यांनी जनता शिक्षण संस्थेच्या निर्मिती पासून ची वाटचाल यावर प्रकाश टाकीत संस्थेच्या मार्गदर्शनात तिन्ही विद्यालयामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित, अनुभव संपन्न शिक्षण प्रणालीचा वापर करून एकविसाव्या शतकातील सुजाण , समृद्ध व कार्यकुशल युवा पिढी घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन केले.
तसेच आमच्या तिन्ही विद्यालयांवर व दोन्ही कनिष्ठ महाविद्यालयांवर पालकांनी व विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवून या संस्थेच्या प्रगतीस जो हातभार लावीत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार मानले. सोबतच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मेहनतीचे कौतुक केले.
सदर सोहळा जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक सतीश मेश्राम यांनी केले तर प्रा. मायकेल बोरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता तिन्ही विद्यालयांच्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

