Top News

बल्लारशाह येथे ५० बेडेड डी.सी.एच.सी. रूग्‍णालय त्‍वरीत उभारावे – आ. सुधीर मुनगंटीवार

 बल्लारशाह येथे ५० बेडेड डी.सी.एच.सी. रूग्‍णालय त्‍वरीत उभारावे – आ. सुधीर मुनगंटीवार



150 बेडेड कोविड केअर सेंटर उभारण्‍यात यावे


जिल्‍हा प्रशासनाकडे त्‍वरीत प्रस्‍ताव सादर करण्‍याचे नगर परिषदेला निर्देश




( विदर्भ माझा न्युज 24 ) बल्लारशाह :-   बल्‍लारशाह शहर तसेच तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागात वाढती कोरोना रूग्‍णांची संख्‍या लक्षात घेता बल्‍लारशाह शहरात ५० बेडेड डी.सी.एच.सी. अर्थात डेझीग्‍नेटेड कोविड हेल्‍थ सेंटर उभारण्‍याची तसेच १५० बेडेड कोविड केअर सेंटर उभारण्‍याची मागणी विधीमंडळ लोक लेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिका-यांकडे केली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज बल्‍लारशाहचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा आणि मुख्याधिकारी विजय सरनाईक यांचेशी याबाबत चर्चा केली व नगर परिषदेने यासंबंधीचा प्रस्‍ताव जिल्‍हा प्रशासनाला सादर करण्‍याचे निर्देश दिले.


वाढती कोरोना रूग्‍ण संख्‍या लक्षात घेता बल्‍लारशाह येथे ५० बेडेड डी.सी.एच.सी. अर्थात डेझीग्‍नेटेड कोविड हेल्‍थ सेंटर उभारणे गरजेचे आहे. त्‍यामध्‍ये 40 ऑक्‍सीजन बेडस् असावेत, याकरिता लागणार ऑक्‍सीजनचा पुरवठा नियमित राहण्‍याकरिता डी.सी.एच.सी. रूग्‍णालयाच्‍या ठिकाणी एक ऑक्‍सीजन प्‍लॅंन्‍ट उभारण्‍यात यावा असे आ. मुनगंटीवार यांनी निर्देशित केले. सदर डी.सी.एच.सी. रूग्‍णालयातील वैदयकीय सेवेकरिता जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक सामान्‍य रूग्‍णालय चांदा(चंद्रपूर)तथा बल्‍लारशाह पेपर मिल येथील वैदयकीय अधिका-यांच्‍या सेवा घेवून कोरोना रूग्‍णांच्‍या सेवेत सदर रूग्‍णालय तात्‍काळ कार्यान्वित करावे असे आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. त्‍याच प्रमाणे बल्‍लारशाह शहरानजिक जे क्रिडा संकुल उभारण्‍यात आले आहे. त्‍या ठिकाणी 150 बेडेड कोविड केअर सेंटर उभारण्‍याचा निर्णय या चर्चे दरम्‍यान झाला. यासंबंधीचा प्रस्‍ताव त्‍वरीत जिल्‍हा प्रशासनाकडे सादर करण्‍याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी नगराध्‍यक्ष व मुख्‍याधिका-यांना दिले.

आजघडीला बल्‍लारशाह तालुक्‍यात 580 अॅक्‍टीव्‍ह रूग्‍ण असुन ही संख्‍या येत्‍या काळात वाढण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता बल्‍लारशाह येथे डी.सी.एच.सी. रूग्‍णालय त्‍वरीत उभारण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांचेकडे केली आहे. 

Previous Post Next Post