नागभीड : मिंडाळा परिसरात मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या T-61 SAF या मादी वाघीणीला वनविभागाने अखेर जेरबंद केले. शुक्रवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी मिंडाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्र. ८७P मध्ये ही कारवाई करण्यात आली.
दिनांक १९ मे २०२६ रोजी FDCM कक्ष क्रमांक १०९ मध्ये किटाळी मेंढा येथील वनिता शंकर उईके यांच्यावर वाघीणीने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी जनकापूर येथील रमेश जयराम काशिवार (वय ५४) हे गट क्रमांक १६८ मधील स्वतःच्या शेतात काम करण्यासाठी गेले असता T-61 SAF या मादी वाघीणीने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा मृत्यू झाला.
या घटनांनंतर सदर वाघीण शेतशिवार तसेच गावालगतच्या परिसरात वारंवार वावरत असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वीही या परिसरात सदर वाघीणीकडून मनुष्य तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाच्या पुढील अनुचित घटना टाळण्यासाठी वाघीणीला जेरबंद करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली.
त्यानुसार शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी उपक्षेत्र मिंडाळा, नियतक्षेत्र मिंडाळा, कक्ष क्र. ८७P येथे पशुवैद्यकीय अधिकारी तथा RRT प्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी डार्ट तयार करून दिल्यानंतर पोलीस हवालदार (शुटर) अजय सी. मराठे यांनी T-61 SAF मादी वाघीणीवर डार्टचा मारा केला. डार्टचा परिणाम झाल्यानंतर वाघीण बेशुद्ध करण्यात आली आणि तिला जेरबंद करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
ही संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. (ब्रम्हपुरी वनविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वनसंरक्षक अरविंद जे. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) कु. भारती एस. बगमारे, वन्यजीव तज्ज्ञ राकेश आहुजा यांच्या सहकार्याने करण्यात आली.
कारवाईदरम्यान एम. पी. तावाडे, क्षेत्र सहाय्यक मिंडाळा, वनरक्षक व क्षेत्रीय कर्मचारी, डॉ. रविकांत खोब्रागडे, RRT पथक तसेच अजय सी. मराठे (पोलीस हवालदार व शुटर), विकास ताजने, योगेश लाकडे, प्रफुल एन. वाटगुरे, गुरूनानक ढोरे, दिपेश टेभुर्णे, वसीम शेख, अमोल कोरपे आणि अक्षय दांडेकर उपस्थित होते.
T-61 SAF वाघीण जेरबंद झाल्याने मिंडाळा परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना कमी होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
