नागभीड : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. निलेश गोडे यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून आचार्य (पीएच.डी.) पदवी प्राप्त केली आहे.
प्रा. गोडे यांनी डॉ. सुरेश रेवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत रसायनशास्त्र विषयात ‘Conversion of Furfural into Valuable Products Using Various Catalysis’ या विषयावर सखोल संशोधन केले. त्यांच्या संशोधनातून घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त जैविक इंधन व मूल्यवर्धित उत्पादने निर्मितीच्या शक्यतांचा अभ्यास करण्यात आला आहे.
संशोधन कार्यादरम्यान प्रा. गोडे यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, चिकित्सक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करत महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या संशोधनावर आधारित अनेक शोध निबंध नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. भविष्यात या संशोधनातून पेटंट मिळविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रा. निलेश गोडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. मनोजभाऊ वनमाळी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक व संशोधनाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रा. गोडे यांच्या या यशामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालयाच्या शैक्षणिक तसेच संशोधन क्षेत्रातील लौकिकात निश्चितच भर पडली आहे.
