Top News

नागभीडात अखंड भारत संकल्प दिवस उत्साहात साजरा





नागभीड : भारत माता पूजन आणि देशभक्तीपर वातावरणात श्रीराम मंदिर, नागभीड येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने ‘अखंड भारत संकल्प दिवस’ उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती, राष्ट्रीय एकात्मता आणि ऐतिहासिक मूल्यांचे जतन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी डॉ. शक्तीजी केराम प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी अखंड भारताचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा उपस्थितांसमोर मांडला. भारताची भौगोलिक अखंडता आणि सांस्कृतिक एकतेचे महत्त्व अधोरेखित करत तरुणांनी देशसेवेसाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.



कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थितांनी ‘अखंड भारत’ निर्मिती आणि देशाच्या अखंडतेसाठी सदैव तत्पर राहण्याची सामूहिक संकल्प प्रतिज्ञा घेतली. साक्षी पिसे आणि जयश्री गरफडे यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.



या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज शास्त्रकार यांनी केले, तर आभार जयश्री गरफडे यांनी मानले.

Previous Post Next Post