Top News

मन की बात’ला बल्लारपुरात युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासदृष्टीला काव्यमय मानवंदना

 अरविंद चुनबाद वर्मा यांच्याकडून काव्यरूप फ्रेम भेट; वृक्षलागवड, आरोग्य व जनहिताच्या कार्याचा गौरव








बल्लारपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे बल्लारपूर शहरातील कला मंदिर, बल्लारपूर शहर नाट्यगृह येथे सामूहिक प्रक्षेपण करण्यात आले. शहरातील सुमारे बारा शाळा व महाविद्यालयांमधील युवक-युवती, शिक्षक तसेच प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. यावेळी युवक-युवतींमध्ये मोठा उत्साह व जोश पाहायला मिळाला.

‘मन की बात’ कार्यक्रमानंतर सहभागी शाळा-महाविद्यालयांच्या प्रतिनिधींसह प्रत्येकी एका युवक-युवतीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सहभागी युवक-युवतींना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.



यावेळी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण भाजपा अध्यक्ष हरीश शर्मा होते. वरिष्ठ नेते राजेंद्र गांधी, ‘मन की बात’ कार्यक्रमाचे संयोजक बृजभूषण पझारे, सहसंयोजक डॉ. काशीनाथ सिंह, यश बांगडे, महिला मोर्चा शहराध्यक्ष वैशाली जोशी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन यश बांगडे यांनी केले, तर प्रस्तावना डॉ. काशीनाथ सिंह यांनी केली.

दरम्यान, भाजपा युवा मोर्चा, बल्लारपूर शहरचे महामंत्री अरविंद चुनबाद वर्मा यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासदृष्टीला कृतज्ञतेची अनोखी भेट देत त्यांच्या कार्याचा गौरव करणारी विशेष काव्यरूप फ्रेम त्यांना भेट दिली. या काव्यमय भेटीत वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन, आरोग्य सुविधा आणि विविध जनहिताच्या कार्याचा गौरव करण्यात आला.



आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सार्वजनिक जीवनातील विकास आणि संवेदनशीलतेचा संगम या काव्यरूप भेटीतून अधोरेखित करण्यात आला. अर्थमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी पर्यावरण संवर्धनाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देत ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प राबविला. या उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. विकासासोबत भविष्यातील पिढ्यांचा विचार करणारी त्यांची दूरदृष्टी या उपक्रमातून दिसून आली.

आरोग्य क्षेत्रातही चंद्रपूर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी तसेच आरोग्य सुविधा जनसामान्यांच्या अधिक जवळ नेण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले. यासोबतच शिक्षण, महिला सक्षमीकरण, रस्ते, पायाभूत सुविधा आणि विविध जनकल्याणकारी उपक्रमांना त्यांनी प्राधान्य दिले.

“यह साधारण केवल नाम नहीं, किसी कुर्सी के मोहताज नहीं…” अशा काव्यमय शब्दांत अरविंद चुनबाद वर्मा यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्याचे केलेले वर्णन हे एका कार्यकर्त्याच्या मनातील कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणारे ठरले. विकासासाठीची तळमळ, जनतेच्या सुख-दुःखाची जाण आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याला या अनोख्या काव्यमय भेटीतून मानवंदना देण्यात आली.

या कार्यक्रमास अरविंद दुबे, कैलास गुप्ता, राजू दासरवार, श्रीनिवास कंदकुरी, श्रीकांत आंबेकर, निखिल निंदेकर, भरतसिंह ठाकूर, मोहित डांगोरे, जयश्री मुहुर्ले, सरोज सिंह, बूथप्रमुख नजमा खान यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते. 


Previous Post Next Post