विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ निकाली काढा....हजारो शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित; समाजकल्याण विभागाचा इशारा
चंद्रपूर : भारत सरकारच्या मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र 2019-20 ते 2025-26 या कालावधीतील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी शासनाने सर्व महाविद्यालयांना 31 मे 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. या मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत शिष्यवृत्ती मंजूर केली जाणार नसल्याचे समाजकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.
समाजकल्याण विभागाने सर्व महाविद्यालयांना डीबीटी प्रणालीद्वारे प्रलंबित अर्जांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी विशेष मोहीम राबवून अर्ज निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात हजारो अर्ज प्रलंबित
महाडीबीटी पोर्टलवरील माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात विविध शैक्षणिक वर्षांतील मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित आहेत.
- 2019-20 : 55 अर्ज
- 2020-21 : 410 अर्ज
- 2021-22 : 221 अर्ज
- 2022-23 : 245 अर्ज
- 2023-24 : 91 महाविद्यालय स्तरावर, 288 विद्यार्थी स्तरावर
- 2024-25 : 287 महाविद्यालय स्तरावर, 445 विद्यार्थी स्तरावर
- 2025-26 : 1230 महाविद्यालय स्तरावर, 645 विद्यार्थी स्तरावर
हे सर्व अर्ज संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी तातडीने निकाली काढावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी काय करावे?
विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासावी. अर्जामध्ये त्रुटी असल्यास संबंधित कागदपत्रांसह महाविद्यालयाशी तातडीने संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रे अपलोड न केल्यास अर्ज रिजेक्ट करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महाविद्यालयांना तातडीच्या सूचना
महाविद्यालयांनी त्रुटी असलेल्या अर्जांबाबत विद्यार्थ्यांशी संपर्क साधून दोन दिवसांत आवश्यक पूर्तता करून अर्ज मंजुरीसाठी पाठवावेत. पात्र अर्जच समाजकल्याण कार्यालयाकडे फॉरवर्ड करावेत आणि अपात्र अर्ज रिजेक्ट करावेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
31 मे 2026 नंतर प्राप्त अर्जांवर कोणतीही कार्यवाही केली जाणार नसून, शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास त्यास संबंधित विद्यार्थी व महाविद्यालय जबाबदार राहतील, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी दिली.
