देहदान हे मानवसेवेचे सर्वोच्च रूप – धर्मगुरू व वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रतिपादन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
वाशीम | हिरासिंग राठोड | : समाजात देहदान व अवयवदानाबाबत असलेले गैरसमज दूर करून सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशीम येथे दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी भव्य देहदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रशासन, वैद्यकीय तज्ज्ञ, विविध धर्मांचे धर्मगुरू आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमास नगराध्यक्ष, पोलीस अधिकारी, उपविभागीय उपजिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सतीन मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय प्राध्यापकवर्ग, डॉक्टर, कर्मचारी, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात Anesthesia, Ophthalmology आणि Anatomy विभागांच्या शास्त्रीय सादरीकरणांनी झाली. देहदान व अवयवदानाचे वैद्यकीय महत्त्व, शास्त्रीय प्रक्रिया, कायदेशीर बाबी, देहदान अधिनियम तसेच नेत्रदानाचे सामाजिक फायदे सोप्या आणि प्रभावी भाषेत मांडण्यात आले. या सादरीकरणात डॉ. रेहमान, डॉ. पुरी आणि डॉ. जाधव यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.
यानंतर विविध धर्मांचे धर्मगुरू पंकज देव महाराज, प्रज्ञापाल भंतेजी आणि पास्तर प्रणय जोसेफ यांनी आपल्या विचारांतून देहदान हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून मानवसेवेचे सर्वोच्च रूप असल्याचे स्पष्ट केले. मृत्यूनंतरही समाजासाठी उपयुक्त ठरणे हीच खरी मानवसेवा असल्याचा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे देहदानाबाबत असलेली धार्मिक भीती व गैरसमज दूर होण्यास मदत झाली.
डॉ. नयना सारडा यांनी आरोग्यसेवेत अवयवदानाचे महत्त्व सविस्तरपणे मांडले. अवयवदानामुळे अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना नवजीवन मिळते, हे प्रत्यक्ष उदाहरणांसह त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर अवयवदानाचा लाभ मिळालेल्या कुटुंबीयांनी आपले अनुभव कथन केले. त्यांच्या भावनिक अनुभवांमुळे हा विषय उपस्थितांच्या मनाला स्पर्श करणारा ठरला.
कार्यक्रमात जनार्दन मगर, अनिल केनदले, मंगल धुपे, विश्वनाथ घुगे, अविनाश माळशेतवार, गजानन हरणे, राजेश घुगे आणि हरिदास बनसोड यांनी प्रशासन, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील समन्वय समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. अशा सामाजिक उपक्रमांना समाजाने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अधिष्ठाता डॉ. सतीन मेश्राम यांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. वैद्यकीय शिक्षण समाजहितासाठी उपयोगी ठरले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशामागे पडद्यामागे कार्यरत असलेल्या सर्व घटकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे आयोजकांनी नमूद केले. उपस्थित नागरिकांनी देहदानाविषयी सकारात्मक विचार स्वीकारून समाजात या विचाराचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
समारोपाच्या वेळी राष्ट्रगीत घेण्यात आले. देहदान व अवयवदानाबाबत समाजात जनजागृती करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला असून, भविष्यात अशा उपक्रमांमुळे अनेकांचे जीवन वाचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

