वंदे मातरमचे १५० वे वर्ष — राष्ट्रभक्तीचा जागर साजरा होणार! शक्ती प्रकाश केराम (सामाजिक कार्यकर्ते, माजी प्रदेश मंत्री – अभाविप, विदर्भ प्रदेश)
नागभीड : “वंदे मातरम्” हे केवळ दोन शब्द नाहीत, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्फुरण आणणारा देशभक्तीचा पवित्र मंत्र आहे. आपल्या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याचा हा अभिमानाचा क्षण साजरा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रभक्तीचा जागर होणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते शक्ती प्रकाश केराम यांनी दिली.
या उपक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास व उद्योग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, हजारो विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.
शक्ती केराम म्हणाले —“वंदे मातरम् म्हणजे केवळ गीत नव्हे, ती आपल्या मातृभूमीला, तिच्या मातीला आणि संस्कृतीला अर्पण केलेली वंदना आहे. या १५० व्या वर्षानिमित्त प्रत्येक युवकाच्या मनात पुन्हा एकदा राष्ट्रप्रेम चेतवले जाणार आहे.”
१ ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यभर वकृत्व, निबंध लेखन, चित्रकला, देशभक्ती गीत गायन अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, समाजसेवा आणि एकतेचा संदेश पोहोचवला जाणार आहे.
७ नोव्हेंबर रोजी प्रत्येक तालुक्यातील निवडलेल्या शाळा किंवा महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ होईल. या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, शिक्षक, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
“वंदे मातरम”चा जयघोष पुन्हा एकदा प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणात गुंजविण्याचा निर्धार या उपक्रमातून दिसून येत आहे.
