सुरज ठाकरेंचा ऐतिहासिक निर्णय – राजुरात राजकीय वादळाची सुरुवात
राजुरात युवक व कामगार वर्गाचे एकवटलेले बळ विरोधकांसाठी नवे आव्हान
संघटित कामगार वर्ग काँग्रेससोबत; सत्ताधाऱ्यांचे गणित बिघडण्याची चिन्हे
राजुरा | राजुरा शहरात आज राजकीय वर्तुळ हादरवून सोडणारी मोठी घडामोड घडली. जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील उदयोन्मुख, धडाडीचे युवा नेतृत्व सुरज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षाचा झेंडा (Congress flag) हाती घेतला. त्यांच्या या पावलाने शहराच्या राजकीय समीकरणात एकदम नवा कलाटणीबिंदू निर्माण झाला आहे.
सुरज ठाकरेंचा काँग्रेस प्रवेश हा केवळ औपचारिकतेपुरता नव्हता, तर तो उत्साह, जयघोष आणि एकात्मतेच्या भावनेने भारलेला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. सुरज ठाकरेंचा पक्षाचा दुपट्टा परिधान करून जंगी स्वागत करण्यात आले. मिठाईच्या गोडव्यात आणि जय भवानीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.
या सोहळ्यास माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी नगरसेवक हरजित सिंग संधू, निराधार योजनेचे माजी अध्यक्ष साईनाथ बतकमवार, अभिजित धोटे तसेच युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अशोक राव यांसारखी अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती.
सुरज ठाकरे हे केवळ संघटनेचे अध्यक्ष नाहीत, तर कामगारांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढणारे, बेरोजगार युवकांना स्थानिक रोजगार मिळावा यासाठी आवाज उठवणारे आणि सामाजिक न्यायासाठी अहोरात्र कार्य करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी कामगार संघटनेने अनेक आंदोलने, रॅली आणि जनहिताचे कार्यक्रम यशस्वी केले आहेत. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाला केवळ तरुणाईचाच पाठिंबा मिळणार नाही, तर कामगार वर्गाशी असलेला थेट संवाद आणि बळ अधिक मजबूत होणार आहे.
स्थानिक राजकारणात या प्रवेशाचे परिणाम त्वरित जाणवू लागले आहेत. आगामी नगरपरिषद निवडणुकांकडे पाहता काँग्रेसच्या गोटात नवचैतन्य संचारले असून, राजुरा शहरातील विरोधकांच्या समीकरणांना धक्का बसण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, सुरज दादांचा जनाधार, लढाऊ स्वभाव आणि संघटन कौशल्य काँग्रेसला शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात नवे राजकीय बळ देणार आहे.
आजचा हा दिवस सुरज ठाकरेंसाठी आणि काँग्रेससाठी नवा प्रवास सुरू करणारा ठरला आहे. कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या हातात आता काँग्रेसचा झेंडा असून, या झेंड्याखाली येत्या काळात राजुरा शहरासह राजुरा विधानसभेत नवी राजकीय लढत पाहायला मिळेल, यात शंका नाही.
