नागभीड बसस्थानक परिसरात वाहतूकिचा गोंधळ; ट्रॅव्हल्स व टिप्परचा धुमाकूळ...नवखडा ते सुलेझरी अपघाताची टांगती तलवार
प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांच्या संयमाचा अंत जवळ, अनुचित घटनेची भीती?
नागभीड, दि. 12 ऑगस्ट 2025 – नागभीड शहरातील नव्याने उभारण्यात येणाऱ्या बसस्थानक परिसरात ट्रॅव्हल्स, टिप्पर आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांचा सुळसुळाट वाढला आहे. वाहतूक नियमनाचा पूर्ण अभाव आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे बेकायदेशीर वाहनचालकांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत असून, कधीही गंभीर अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्यावर गोंधळाचे साम्राज्य
नव्या बसस्थानकाच्या दोन्ही बाजूंना ट्रॅव्हल्स वाहनांची बिनधास्त उभीकरणे सुरू असून त्यामुळे मुख्य रस्ता अडवला जातो. राहुल बारसमोर खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांची लांबलचक रांग असते, तर दुसऱ्या बाजूस ऑटोरिक्षांची लाईन लागलेली दिसते. या मध्ये भरधाव वेगाने धावणारे टिप्पर जीवघेणी परिस्थिती निर्माण करतात.
बसस्थानकाचे बांधकाम सुरू असल्याने बस वळवण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक नाही. परिणामी, वाहनचालक आणि प्रवासी तणावाखाली प्रवास करत आहेत. प्रफुल चंद्र रे आय.टी.आय. नवखळा पासून ते सँजो पब्लिक स्कूलपर्यंत ट्रॅव्हल्स, टिप्पर आणि जड वाहनांचा वेग चिंताजनक असून, अपघाताचा धोका सातत्याने वाढत आहे.
नियमांचे उल्लंघन – प्रशासन मौन
वाहतुकीच्या कोणत्याही नियोजनबद्ध पर्यायाचा अभाव, तसेच ट्रॅव्हल्स,टिप्पर व जड वाहतूक नियमांचे खुलेआम उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कोणतीही कारवाई न होणे, यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिक गंभीर धोक्यात आहेत. प्रशासनाची मौन भूमिका संतापजनक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
नागरिकांची ठाम मागणी
स्थानिकांच्या मते, शहरातील वाढती वाहतूक आणि बसस्थानकाजवळील गोंधळावर त्वरित उपाययोजना राबवणे अत्यावश्यक आहे. वाहतूक नियमन, ट्रॅव्हल्स व टिप्पर वाहतुकीसाठी निश्चित वेळापत्रक, गतीरोधक बसविणे, वेगमर्यादा निश्चित करणे अशा उपाययोजना प्रशासनाने तत्काळ हाती घ्याव्यात. अन्यथा जनतेच्या संतापाचा उद्रेक होणे अटळ असल्याच मत नागरिकांनी वेक्त केले आहे.

-02.jpeg)