आरमोरीचा धडा न शिकणारे नागभीड प्रशासन; भरधाव ट्रक-ट्रॅव्हल्स ‘मौत का सौदा’ सुरूच!
टी-पॉईंट ते राममंदिर मार्गावर ‘अपघाताचा काउंटडाउन’; बजरंग दलाचा नागभीड प्रशासनाला अल्टिमेटम
नागभीड :: आरमोरीजवळील काटळी गावात चार युवकांचा जीव घेणाऱ्या भीषण अपघाताची धग आता नागभीडमध्ये जाणवू लागली आहे. शहरातील ‘टी पॉईंट ते राममंदिर’ व नवखळा ते सुल्लेझरी हा रस्ता मृत्यूच्या सावलीत आल्याचा नागरिकांचा इशारा आहे. दररोज भरधाव वेगाने धावणारे रेतीचे ट्रक आणि ट्रॅव्हल्स बस या मार्गावर जीवघेणा खेळ मांडत आहेत.
राममंदिर चौक हे पादचारी, विद्यार्थी आणि प्रवाशांचे केंद्र. पण फुटपाथच्या बाहेर आलेली दुकाने आणि रस्त्यावर उभे केलेली वाहने यामुळे चौकातून येणारी भरधाव वाहने नजरेआड होतात. "अशा परिस्थितीत अपघात होणार नाहीत, हे सांगणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवणं!" असा संतप्त बजरंग दल ने वेक्त केला आहे.
फक्त एवढंच नाही – राममंदिर ते शिवमंदिर या रस्त्यावर नुकतेच बसवलेले स्ट्रीट लाईटचे खांबही मृत्यूचा सापळा ठरत आहेत. टर्मिनल बॉक्स उघडे, वायरिंग साध्या सर्व्हिस वायरने, कोणतेही संरक्षण नाही! "एका मुलाला किंवा नागरिकाला शॉक बसून जीव गेला तर जबाबदार कोण?" असा थेट सवाल बजरंग दल नागभीड ने नगर परिषद व पोलीस प्रशासनाला केला आहे.
"आम्ही आधीच इशारा देतोय… पण प्रशासन जागं होणार कधी? मृत्यू झाल्यावर की त्याआधी?" – असा प्रश्न आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असलेल्या नागभीड येथील बजरंग दलने उपस्थित केला आहे.
या सर्व गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी बजरंग दल तर्फे नगर परिषद मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन नागभीड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देताना अभिषेक जैस्वाल, ओमप्रकाश मेश्राम, अशोक पिसे, शुभम सुरपाम, विनय पिसे, मंगेश कुंभारे, विजयी दैवलकर, ज्ञानेश्वर निनावे, निखिल तर्वेकर, यश वाकळे, सार्थक चिंतावार, हिमांशू समर्थ, आशिष गजभे,पंकज खनके,समीर गायधणे, महेश गायधणे, सचिन बेंडेवार हे बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते.
जर तात्काळ गतीरोधक बसवले नाहीत, वेगमर्यादा लागू केली नाही आणि उघडी वायरिंग दुरुस्त केली नाही तर नागभीडमध्ये काटळी गावासारखी रक्तरंजित घटना घडण्याची केवळ वेळ बाकी आहे!.

