नागभीड नगर परिषद मार्फत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद – तिरंगा रांगोळी व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
नागभीड, १३ ऑगस्ट – शासनाच्या निर्देशानुसार व माझी वसुंधरा अभियान 6.0 तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत नागभीड नगर परिषदेतर्फे “हर घर तिरंगा – 2025” या उपक्रमाचा आज उत्साहपूर्ण प्रारंभ झाला.
प्रशासक तथा मुख्याधिकारी सोनम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जनता कन्या विद्यालय आणि जनता मुलांची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जनता कन्या विद्यालयाच्या प्रांगणात भव्य तिरंगा रांगोळी साकारण्यात आली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणाबाजी करत तिरंगा प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
याचबरोबर नागरिकांच्या सोयीसाठी नगर परिषद कार्यालयात तिरंगा विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. “ज्या नागरिकांना तिरंगा आवश्यक आहे, त्यांनी नगर परिषदेतून तिरंगा खरेदी करून आपल्या घरावर अभिमानाने फडकवावा,” असे आवाहन मुख्याधिकारी देशमुख यांनी केले.
या उपक्रमामुळे शहरात देशभक्तीचा माहोल निर्माण झाला असून नागरिकांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा फडकावण्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.


