Top News

राजे रघुजी भोसलें ची ऐतिहासिक तलवार राज्याच्या ताब्यात; लंडनमधून सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी केला स्विकार

राजे रघुजी भोसलें ची ऐतिहासिक तलवार राज्याच्या ताब्यात; लंडनमधून सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी केला स्विकार



नागपूरनागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि मराठा साम्राज्यात ‘सेनासाहिबसुभा’ म्हणून गौरवले गेलेले राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर राज्य सरकारच्या ताब्यात आली आहे. 29 एप्रिल रोजी लिलावातून खरेदी झालेल्या या अमूल्य ऐतिहासिक वस्तूचा प्रत्यक्ष ताबा आज लंडनमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी स्वीकारला. काही तांत्रिक कारणांमुळे ही खरेदी मध्यस्थामार्फत करावी लागली होती. आता सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती अधिकृतपणे महाराष्ट्राच्या मालकीत आली आहे. 


सोन्याच्या नक्षीकामाने सजलेली, मराठा शैलीतील फिरंग पद्धतीची ही तलवार युरोपियन पात्याची दुर्मिळ कलाकृती आहे. पात्याच्या पाठीवर ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ अशी सोन्याच्या पाण्याने केलेली अक्षरे आजही झळकत आहेत. इतिहासकारांच्या मते, 1817 मध्ये नागपूरच्या खजिन्यावर ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या लुटीत ही तलवार नेली गेली असावी.

राजे रघुजी भोसले यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार बंगाल, ओडिशा तसेच दक्षिण भारतापर्यंत नेला होता. ही तलवार लवकरच महाराष्ट्रात येणार असून, ती कायमस्वरूपी राज्य सरकारच्या ताब्यात राहणार आहे. या उपक्रमासाठी प्रयत्नशील राहिल्याबद्दल मंत्री आशीष शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक होत आहे.

Previous Post Next Post