राजुरा विधानसभा: ११,६६७ वाढीव मतदारांचा शोध घेण्यासाठी सुरज ठाकरे मैदानात
मत चोरीच्या शंकेवरून निवडणूक आयोगाला RTI नोटीस
राजुरा (जि. चंद्रपूर) – विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आणि भाजपवर मत चोरीचे गंभीर आरोप केल्यानंतर देशभरात चर्चेला ऊत आला आहे. या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर जिल्ह्यातील २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आकडेवारीत आढळलेली तफावत राजुरा विधानसभा मतदारसंघात संशयाचे वारे निर्माण करत आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील मतदानाच्या आकडेवारीनुसार, लोकसभा निवडणुकीत ३,१३,६११ तर विधानसभा निवडणुकीत ३,२५,२७८ इतकी मते नोंदविली गेली. केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत ११,६६७ मतदारांची वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असून, ही वाढ नैसर्गिक आहे की कृत्रिम, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी ११ ऑगस्ट रोजी माहिती अधिकार कायद्यान्वये (RTI) निवडणूक आयोगाकडे वाढीव मतदारांची संपूर्ण यादी मागविली आहे. त्यांच्या मागणीनुसार, १ जानेवारी २०२४ ते २० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत मतदार यादीत समाविष्ट झालेल्या सर्व वाढीव मतदारांचे तपशील, त्यांची नोंदणीची कारणे आणि संपूर्ण दस्तऐवज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
ठाकरे यांनी स्पष्ट केले, माहिती मिळाल्यानंतर वाढीव मतदार बोगस असल्याचे किंवा मत चोरीचा प्रकार आढळल्यास आम्ही थेट न्यायालय व उच्च न्यायालयात धाव घेऊन राजुरा मतदारांना न्याय मिळवून देऊ.
या घडामोडीनंतर राजुरा मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये याबाबत तीव्र उत्सुकता व चर्चेला उधाण आले आहे. आगामी दिवसांत या प्रकरणाचे पडसाद जिल्ह्याच्या पलीकडे उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
