Top News

७० वर्षांनंतर भारतात चित्ता परतला, पंतप्रधान मोदींनी चित्ते जंगलात सोडले.....

७० वर्षांनंतर भारतात चित्ता परतला, पंतप्रधान मोदींनी चित्ते जंगलात सोडले.....


तो भारतातून नामशेष केव्हा झाला?



 विदर्भ माझा न्युज 24 - दिल्ली 


गेले अनेक दिवस चर्चेत असलेले चित्ते अखेर भारतात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. भारताच्या धरतीवर 70 वर्षानंतर चित्ता परतला आहे, त्यामुळे जैवविविधेतच्या तुटलेल्या साखळीला जोडण्याची मोठी संधी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. वैज्ञानिक सर्व्हेनंतरच कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ते आणले गेले आहे. पण चित्ते आपल्याकडे पाहुणे आहेत, त्यांना काही वेळ द्यायला हवा, त्यामुळे पर्यटकांना लगचेच चित्त्यांना पाहता येणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी गेल्या अनेक वर्षात अर्थपूर्ण प्रयत्नच केले गेले नाहीत, अशी टीका देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात देशात नव्या ऊर्जेने चित्त्यांचे पुनर्वसन होत आहे, जेव्हा निसर्ग आणि पर्यावरणाचे संरक्षण होते, तेव्हा आपले भविष्यही सुरक्षित असते, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

हा प्राणी आज भारतात अस्तित्वात आहे का असा प्रश्न जर विचारण्यात आला तर कुणीही हो असेच उत्तर देणार कारण भारतात बिबट्यालाच चित्ता म्हणतात....


चित्ता हा सर्वात जास्त वेगवान समजला जाणारा प्राणी. हा प्राणी आज भारतात अस्तित्वात आहे का असा प्रश्न जर विचारण्यात आला तर कुणीही हो असेच उत्तर देणार, कारण भारतातल्या अनेक राज्यांत बिबट्याला चित्ता याच नावाने ओळखले जाते. पण सत्य मात्र वेगळेच आहे. देशातला शेवटचा चित्ता हा १९४७ सालीच मरण पावला. म्हणजेच देश स्वतंत्र झाला तेव्हापासून देशात चित्ता अस्तित्वात नाही. 

१९४७ साली छत्तीसगड येथील कोरीया संस्थानचे राजे रामानुज प्रताप सिंग देव यांनी शेवटच्या चित्त्याची शिकार केली. पुढे पाच वर्षांनी म्हणजे 1952 साली भारताने चित्ता देशातून नामशेष झाल्याचे घोषित केले. पण आता एक चांगली बातमी आली आहे. देशात पुन्हा एकदा वेगवान चित्त्यांचा प्रवेश झाला आहे. 

भारतातून चित्ता नामशेष झाला त्याला कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या....


आता प्रश्न उरतो तो हा की भारतातून चित्ता नामशेष झाला त्याला कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या. मागे यूएनसीसीडीच्या एका कॉन्फरन्समध्ये भारतातील शिष्टमंडळाने चित्त्यांच्या नामशेष होण्यामागे जंगलतोड हे कारण होते असे म्हटले होते. पण हे कारण १०० टक्के खरे आहे असे देखील नाही. यामागील इतर कारणे शोधण्याचा प्रयत्न केला तर दिसून येते की, स्वातंत्र्यपूर्व काळात मोठ्या प्रमाणावर होत असलेली शिकार हे मोठे कारण होते. 

भारतात आता बिबट्यांना बघून चित्ता म्हणण्याचे दिवस संपतील.....

काहीही असले तरी भारतात आता बिबट्यांना बघून चित्ता म्हणण्याचे दिवस संपतील असे म्हणण्यास वाव आहे. ज्याप्रमाणे देशात जागरूकतेने वाघांची संख्या वाढवली जात आहे. त्याचप्रमाणे देशातील संरक्षित जंगलांमध्ये चित्ते दिसू लागणार आहेत.


Previous Post Next Post